'सैराट' प्रेमाचा 'द एन्ड'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

असा आखला प्लान
प्रशांत आणि बबलीने घरून काही पैसे घेतले होते. त्यांनी थेट रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वेने गोंदिया येथे उतरल्यानंतर छत्तीसगडमधील रायपूर शहरात जाऊन लग्न करून संसार थाटण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार बॅगमध्ये कपडे आणि मंगळसूत्रही त्यांनी घेतले होते.
 

नागपूर : पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा प्रशांत (बदललेले नाव) आणि रेल्वे अधिकाऱ्याची मुलगी बबली (बदललेले नाव) हे दोघेही सिव्हिल लाइन्समधील नामांकित शाळेत नववीत शिकतात. सोबत अभ्यास करताना दोघांची मने जुळली. दोघांनीही चित्रपटातील प्रेमकथेतून प्रेरणा घेत लग्न करून सुखी संसार थाटण्याचे स्वप्न बघितले. स्वप्नपूर्तीसाठी दोघांनीही रेल्वेने पळ काढला. मात्र, प्रेमकथेला अनेक वळणेही असतात. या दोघांच्या प्रेमकथेनेही वळण घेतले अन्‌ पोलिसांनी त्यांना पालकांच्या स्वाधीन केल्याने ते आपापल्या घरी पोहोचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत (15) हा नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत एका अधिकाऱ्याचा मुलगा आहे. तो सिव्हिल लाइन्स परिसरातील एका नामांकित शाळेत शिकतो. रेल्वे अधिकाऱ्याची मुलगी बबलीही प्रशांतसोबत याच शाळेत नववीत शिकते. दोघेही पाचव्या वर्गापासून सोबत शिकत असल्यामुळे दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडले. नववीची प्रथम सत्राची परीक्षा संपल्यानंतर त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय पक्‍का केला. रविवारी सकाळी प्रशांतने मित्राच्या घरी तर बबलीने मैत्रिणीच्या घरी होमवर्क करायला जात असल्याचे सांगून घरातून पोबारा केला. कुठेतरी जाऊन संसार थाटण्याची स्वप्ने रंगवतानाच दोघांच्याही पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. गुन्हे शाखेच्या मदतीने तातडीने हालचाली करीत गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यातून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची योजना ऐकून दोघांच्याही पालकांसह पोलिसही आश्‍चर्यचकित झाले. अशा प्रकारे "सैराट' लव्हस्टोरीचा "दी एन्ड' झाला.

असा आखला प्लान
प्रशांत आणि बबलीने घरून काही पैसे घेतले होते. त्यांनी थेट रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वेने गोंदिया येथे उतरल्यानंतर छत्तीसगडमधील रायपूर शहरात जाऊन लग्न करून संसार थाटण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार बॅगमध्ये कपडे आणि मंगळसूत्रही त्यांनी घेतले होते.

रेल्वेच्या डब्यातून घेतले ताब्यात
प्रशांतच्या वडिलांनी हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात धाव घेत "मिसिंग'ची तक्रार दाखल केली. दुसरीकडे बबलीच्या पालकांनीही शोधाशोध सुरू केली. गुन्हे शाखेचे उपायुक्‍त संभाजी कदम यांनी लगेच आंचल मुद्‌गल यांना प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास सांगितले. मोबाईल लोकेशनवरून दोन्ही मुले गोंदियाकडे रेल्वेने जात असल्याचे कळले. गोंदिया जीआरपीचे देव कनोजिया यांना फोनवरून या मुलांना शोधण्यास सांगितले. शालेय गणवेशातील प्रशांत आणि बबलीला पोलिसांनी रेल्वेच्या डब्यातून ताब्यात घेतले. पालकांनी गुन्हे शाखेचे आभार मानून दोघांनाही घरी नेल्याची माहिती आहे.

Web Title: youth and girl suicide in Nagpur