युवकाने केला अत्याचाराचा प्रयत्न; भोगावी लागणार दहा वर्षे शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

- जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
यवतमाळ : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी युवकाला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. मोहिउद्दीन यांनी सोमवारी (ता. 4) हा निकाल दिला. राम बबन दमकोंडावार (रा. इंदिरानगर, यवतमाळ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

यवतमाळ : 24 एप्रिल 2018 ला सायंकाळी सहा वाजता दरम्यान अल्पवयीन मुलगी खेळत असताना आरोपी युवकाने तिला घराच्या गच्चीवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. पीडितेच्या आईला ही घटना माहीत झाली. पीडितेच्या आईने वडगाव रोड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून आरोपी राम दमकोंडावर याच्याविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस अधिकारी अमोल बारापात्रे व सुगत पुंडगे यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सदर खटल्यात एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता, तिची आई यांची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला कलम 376 (3) नुसार दहा वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. कलम 354 (ड) नुसार तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, कलम 506 नुसार एक वर्ष कैद व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील संदीप दर्डा यांनी काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth attempt to torture; Sentenced to ten years