पबजी गेममुळे झाल्या त्याच्या दोन्ही किडन्या निकामी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

दिवसभर पबजी गेम खेळल्यामुळे सायकोसिसग्रस्त तसेच दोन्ही किडनी निकामी झाल्याने रितिक विवेक कोलारकरचा (वय १९, रा. कावरापेठ, उमरेड) शनिवारी मृत्यू झाला.

उमरेड -  दिवसभर पबजी गेम खेळल्यामुळे सायकोसिसग्रस्त तसेच दोन्ही किडनी निकामी झाल्याने रितिक विवेक कोलारकरचा (वय १९, रा. कावरापेठ, उमरेड) शनिवारी मृत्यू झाला. मागील महिनाभरापासून तो डायलिसीसवर होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरू केले होते.  

रितिक जून महिन्यात अचानक आजारी पडला होता. त्याचे डोळे बंद होत नसल्यामुळे घरच्यांनी त्याच्यावर विविध उपचार केले. नेत्ररोगतज्ज्ञाकडे तपासणी केल्यावर त्याला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपराचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यावेळी विविध तपासण्याअंती त्यास सायकोसिस आजार झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तसे होण्यास पबजी गेम कारणीभूत असल्याचे डॉक्‍टरांचे मत होते. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना  त्याची प्रकृती गंभीर झाली होती. हिमोग्लोबीनचा स्तर कमी झाला, यासोबतच्या त्याच्या दोन्ही किडनी निकाली झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्याच्यावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयातही उपचार करण्यात आले. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारानंतर त्याला उमरेड येथील घरी आणले होते. त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरू होते, अशी माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली आहे.

तासन्‌तास खेळत होता गेम 
रितिक हा स्थानिक स्व. देवरावजी इटनकर आयटीआयचा विद्यार्थी होता. तो मित्र समूहात तासन्‌तास मोबाईलवर ‘पबजी’ खेळण्यात व्यस्त राहत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. पबजी गेममुळे एका तरुणाचा जीव गेल्यामुळे उमरेड शहरात ही बातमी पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth become victim pubg game

टॅग्स