
पाणी हे जीवन आहे. ते मिळविण्यासाठी माणसाला हल्लीच्या काळात खूप कष्ट उपसावे लागत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील नारायणगुडा गावात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. विहिरीतून पाणी काढताना एका युवकाचा पाय घसरला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
जिवती (जि. चंद्रपूर) : जिवती तालुक्यातील नारायणगुडा गावात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. गावातील हातपंप बंद असल्याने विहिरीच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मात्र, विहिरीतून पाणी काढणे एका युवकाच्या जिवावर बेतले आहे. पाणी काढताना पाय घसरून युवक विहिरीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना तालुक्यातील कुंभेझरी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या नारायणगुडा येथे घडली. मारोती वैजनाथ कोसे (वय 22) असे मृत युवकाचे नाव आहे. पाण्यासाठी युवकाचा जीव गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जिवती तालुक्यातील अनेक गावांत उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गाव परिसरातील नाले, विहिरीतील पाण्यावर येथील नागरिक तहान भागवीत असतात. कुंभेझरी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या नारायणगुडा येथे हातपंप आहे.
गावातील नागरिक या हातपंपाच्या पाण्यावर तहान भागवीत होते. मात्र, मागील दहा दिवसांपासून हातपंपाला पाणी येणेच बंद झाले आहे. त्यामुळे गावातील नागरिक सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील खड्ड्यातील पाणी आणून तहान भागवीत असत. मात्र, त्या खड्ड्यातील पाणीसुद्धा आता आटले आहे.
असं घडलंच कसं? : कोरोनामुळे या व्यवसायावर आली अवकळा...
त्यामुळे गावाजवळील एका विहिरीतून पाणी आणत होते. मारोती कोसे हा पाणी काढत असताना पाय घसरून विहिरीत पडला. यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.