बाघ नदीत बुडाला युवक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

रावणवाडी (गोंदिया) :  रजेगाव कोरणीघाट येथील बाघ नदीत युवक बुडाल्याची घटना रविवारी (ता. 11) सकाळी दहाच्या सुमारास घडली. सेल्फी घेण्याच्या नादात दगडावरून पाय घसरल्याने ही घटना घडल्याचे बोलले जाते. राजेश आसाराम मरस्कोल्हे (वय 17, रा. न्यू लक्ष्मीनगर, गोंदिया) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस व रेस्क्‍यू टीमकडून शोधकार्य सुरू होते.

श्रावण महिन्यात कावडीया लोक महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवरील बाघ नदीतील पाणी आणून भोले बाबांचा अभिषेक करतात. त्यामुळे राजेश मरस्कोल्हे हा आपल्या सहकाऱ्यांसह पाणी आणण्यासाठी बाघ नदी काठावर रविवारी सकाळी गेला होता. या वेळी त्याला सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.
दरम्यान, नदीतील दगडावर उभा होऊन सेल्फी घेत असताना पाय घसरल्याने तो नदीत बुडाला, असा प्राथमिक अंदाज आहे. तथापि, या घटनेची माहिती होताच पोलिस कर्मचारी व रेस्क्‍यू टीमने घटनास्थळ गाठून शोधकार्य सुरू केले. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. उल्लेखनीय म्हणजे, श्रावण महिन्यात कावडीया लोक जलाभिषेक करण्यासाठी बाघ नदीतील पाणी आणतात. असे असतानाही सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रशासनाप्रति रोष व्यक्त केला आहे.
सूचना फलकदेखील नाही
श्रावण महिन्यात नदीवर पाणी आणण्यासाठी मोठी गर्दी असते. असे असतानाही प्रशासनाकडून या स्थळी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. सूचना फलकदेखील लावण्यात आले नाही. त्यामुळे अशा घटना घडत असतात. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक आणि सूचनाफलक ताबडतोब लावावे, अशी मागणी होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth drowned in tiger river