युवा पिढीला ‘सिरप’ व्यसनाचा विळखा

Syrup
Syrup

नागपूर - अल्पवयीन मुलांसह युवक आता नशा करण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्यांचा वापर करीत आहेत. शहरात मुले, युवकांमध्ये खोकल्याच्या सिरपचा नशा करण्यासाठी वापर होत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. यासोबतच व्हाइटनर, सोल्यूशनचाही वापर करीत आहेत. त्यामुळे युवा पिढी बरबाद होण्यापासून वाचविण्याचे नवे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हिवाळा सुरू झाला असून, सर्दी-खोकल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यानुसार औषधांच्या दुकानात कफ सिरपचा खपही वाढला आहे. खपवाढीमागे केवळ सर्दी-खोकला हेच कारण नाही. सिरपचा औषध म्हणून कमी आणि नशेसाठी अधिक वापर होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. गर्दुल्यांसह उच्चभ्रू तरुणांमध्ये सिरपची मागणी वाढली असून, मित्रांच्या पार्ट्यांमध्येही सिरपचा नशेसाठी वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्हे शाखेचे उपायुक्‍त संभाजी कदम यांनी अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांविरोधात कंबर कसली आहे. त्यामुळे गांजा, भांग, ड्रग्ससह अन्य वस्तू सहजासहजी उपलब्ध होत नाही. यामुळे नशेबाजांनी प्रतिबंधित औषधांचा डोस घेण्याकडे कल वाढला आहे. 

फार्मसीमध्ये कफ सिरप हे प्रिस्क्रिप्शनशिवाय सर्वाधिक विक्री होणारे औषध आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा कफ सिरपची मागणी जवळपास दुपटीने वाढली असून, छोट्या-छोट्या पार्ट्यांमध्येही याचा नशेसाठी वापर केला जात असल्याचे अंमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.

नशेसाठी दोनशे मिलि पुरेसे
कफ सिरप हे औषध म्हणून घेतल्यास त्याचे १० मिलि पुरेसे असते. नशेसाठी दोनशे मिलिची बाटली नशेबाज पितात. हे सिरप तत्काळ परिणाम दाखवते. ते ड्रग्जप्रमाणे उत्तेजित करते व शरीर सुस्त करते. 
अधिक प्रमाणात घेतल्यास ते धुंदी व झोप आणते. तसेच दारू प्यायल्यासारखे वाटते. त्यामुळे याची क्रेझ निर्माण झाली आहे.

खोकल्याचे औषध का?
  कफ सिरप फार्मसीमध्ये सहज मिळते.
  पोलिसांच्या तावडीत सापडण्याची शक्‍यता कमी.
  सर्दी, खोकला सांगितल्याने घरच्यांनाही संशय येत नाही.
  इतर ड्रग्जच्या तुलनेत स्वस्त मिळते.
  दारू किंवा ड्रग्जप्रमाणे दुर्गंधी येत नाही.

युवकांमध्ये कफ सिरपचा ट्रेंड नशेसाठी दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणांच्या हालचालींवर आम्ही नजर ठेवून आहोत. मात्र, कुणाच्या खिशात औषध आढळल्यास किंवा सेवन करून आढळल्यास कारवाई करण्यास अडचणीचे ठरते.
- संभाजी कदम, पोलिस उपायुक्‍त, गुन्हे शाखा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com