मानकापुरात बांधणार "युथ होस्टेल' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

नागपूर - राष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांना हक्‍काचे निवासस्थान उपलब्ध व्हावे, यासाठी देशभर युवा वसतिगृहे (युथ होस्टेल्स) बांधण्यात येत आहेत. नागपूरकरांचीही ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुल परिसरात बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाला शासनाकडून हिरवी झेंडी मिळाली. देशविदेशातील विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धेच्या निमित्ताने नागपुरात येणाऱ्या खेळाडूंना वसतिगृहाचा लाभ मिळेल. 

राज्यातील युवक-युवतींना भावी आयुष्याच्या जडणघडणीसाठी परीक्षा, प्रशिक्षण, मुलाखती, शिबिरे तसेच विविध चर्चासत्रांमध्ये नियमितपणे सहभागी व्हावे लागते. त्यासाठी युवा वसतिगृहे आवश्‍यक आहेत. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र शासनातर्फे युवा धोरणाअंतर्गत विविध शहरांमध्ये विभागीय क्रीडासंकुलाच्या ठिकाणी वसतिगृहे बांधली जात आहेत. नागपुरातही लवकरच वसतिगृह उभे राहणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव फेब्रुवारी 2015 मध्येच शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून "फॉलोअप' घेण्यात न आल्याने फाइल पुढे सरकली नाही. मात्र, सत्तापक्ष नेते संदीप जोशी आणि क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांच्या पुढाकाराने आता या दिशेने निर्णायक पाऊल टाकण्यात आले आहे. वसतिगृहाला शासनाकडून नुकतीच हिरवी झेंडी मिळाली असून, 3 कोटी 70 लाखांचा निधी मंजूरही झाला आहे. समितीच्या बैठकीनंतर बांधकामाचे टेंडर निघणार आहे. वसतिगृहाचे बांधकाम 18 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेवतकर यांनी सांगितले. 

असे राहणार वसतिगृह 
चार कोटी खर्चून बांधण्यात येणारे या वसतिगृहाचे डिझाइन तयार झाले. संकुल परिसरातीलच सिंथेटिक ट्रॅकच्या बाजूला बांधण्यात येणार आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज राहणाऱ्या या वसतिगृहात एकूण 14 निवासी ब्लॉक्‍स असतील. यात सहा एक्‍झिक्‍युटिव्ह सुट्‌स, चार व्हीआयपी बॅरेक, कॅन्टीन, पॅन्ट्री (डायनिंग हॉल), ई-लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, संगणक इत्यादी राहणार आहे. यात शंभरावर युवा, खेळाडू तसेच अधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था राहणार आहे. 

खेळाडूंनाही होणार फायदा 
या वसतिगृहाचा लाभ केवळ प्रशिक्षणार्थी युवक-युवतींनाच मिळणार नसून, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या निमित्ताने नागपुरात येणाऱ्या खेळाडूंनाही फायदा होणार आहे. सद्य:स्थितीत मोठ्या स्पर्धेसाठी आयोजकांना सर्वस्वी आमदार निवासावरच अवलंबून राहावे लागते. वसतिगृह झाल्यानंतर खेळाडूंना निवासाचा एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यात नागपुरात अधिकाधिक मोठ्या स्पर्धांचे आयोजन होऊ शकेल. 

Web Title: youth hostel build in mankapur