दातोडी येथील तरुणाचा खून पायवाटीच्या वादातून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

आर्णी (जि. यवतमाळ) - तालुक्‍यातील दातोडी शिवारात तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना रविवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेतात जाणाऱ्या पायवाटीच्या वादातून त्याचा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले. दरम्यान, या खुनातील संशयित आरोपीला पारवा पोलिसांनी अटक केली आहे.

विजय रामहरी मुसळे (वय 47, रा. दातोडी) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे, तर मनोज दत्तात्रेय सीडाम (वय 37, रा. दातोडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची तक्रार मृत मनोजचा भाऊ महेंद्र सीडाम यांनी पारवा पोलिस ठाण्यात दिली आहे. संशयित विजय मुसळेशी त्यांचा दातोडी (थड) शिवारातील त्यांच्या शेतात जाणाऱ्या पायवाटीवरून वाद होता. त्यातूनच त्यांचे नेहमीच खटके उडत होते. रविवारी (ता.18) मनोज त्याच्या दुचाकीने शेतात गेला होता. दुचाकी मुख्य रस्त्यावर ठेवून तो पायवाटीने शेतात जात असताना त्याचा विजय मुसळेशी वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने मुसळेने विळ्याने मनोजवर वार केला. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याने जीव वाचविण्यासाठी गावाकडे धाव घेतली. मात्र, तो वाटेतच कोसळला. दरम्यान, त्याची आरडाओरड ऐकून गावातील गुराखी व शेजारी शेतकरी घटनास्थळी धावून आले, तोपर्यंत महेंद्र सीडाम घटनास्थळी पोहोचला, त्याने शेजारी शेतकरी महिलेच्या शेतावरून आणलेले पाणी मनोजला पाजले. त्याने विजयने त्याच्यावर हल्ला केल्याचे सांगितले, तेवढ्यात त्याचा मृत्यू झाला. पारवा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रात्री उशिरा संशयित विजय मुसळेला अटक करण्यात आली.

Web Title: youth murder in yavatmal