'ते' सातजण दीड तासापासून ठेवत होते पाळत, मग... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

घटनास्थळी दीड तासापासून सातजण मनीषवर पाळत ठेवून होते. मनीषच्या काकाचे चित्रा चौकात फुटाणे विक्रीचे दुकान आहे. तो दुकानातून जात असताना वाहनस्थळाजवळ सातही जणांनी त्याला घेरले. त्यापैकी तिघांजवळ चाकू तर एकाजवळ कोयता होता. एकाने जवळच्या हॉटेलमधला चाकूही घेतला होता.

अमरावती : मनीष कन्हय्यालाल गुप्ता (वय 35, रा. विलासनगर) हा गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. वर्चस्वाच्या चढाओढीतून त्याने एकावर प्राणघातक हल्ला केला होता. वर्षभरानंतर दुसऱ्याने आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेत मनीषचा खून केला. हे हत्याकांड रविवारी (ता. 26) प्रजासत्ताकदिनी घडले. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी चौघांना अटक केली असून, अल्पवयीनासह तिघे फरार आहेत. 

रविवारी (ता. 26) रात्री पावणेनऊच्या सुमारास मनीषला चित्रा चौक येथील महापालिकेच्या वाहनस्थळाजवळ एकटे गाठून सशस्त्र हल्ला केला. गंभीर जखमी मनीषला आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादम्यान मध्यरात्री मनीषचा मृत्यू झाला. विशाल विजयसिंग परिहार, सूरज जयसिंग चांदणे, आदेश प्रमोद सावंत व पवन मोरेश्‍वर सोळंके अशी अटकेतील हल्लेखोरांची नावे आहेत. किरण शेवणे, भारत घुगे यासह एक अल्पवयीन (सर्व रा. विलासनगर) हे तिघे अद्याप फरार असल्याचे सहायक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांनी सांगितले. 

जाणून घ्या - ...अन्‌ साखरपुड्याच्या दिवशीच निघाली अंतयात्रा

घटनास्थळी दीड तासापासून सातजण मनीषवर पाळत ठेवून होते. मनीषच्या काकाचे चित्रा चौकात फुटाणे विक्रीचे दुकान आहे. तो दुकानातून जात असताना वाहनस्थळाजवळ सातही जणांनी त्याला घेरले. त्यापैकी तिघांजवळ चाकू तर एकाजवळ कोयता होता. एकाने जवळच्या हॉटेलमधला चाकूही घेतला होता. मनीषला आधी बेदम मारहाण केली. त्याच्यावर शस्त्राने तब्बल तेरा ते चौदा वार केले. एकाने दगडही मारला. गंभीर जखमी झाल्यानंतर हल्लेखोर दुचाकीने पळून गेले. मनीषचा भाऊ शीतलाप्रसाद कन्हय्यालाल गुप्ता (वय 40) यांच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध शहर कोतवाली ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Image may contain: 1 person, standing, outdoor and nature
मृत मनीष गुप्ता 

हल्लेखाराच्या भावावर केला होता हल्ला

मनीषने एक वर्षापूर्वी शरद शेवणे याच्यावर गाडगेनगर हद्दीतील एका वाइनशॉपसमोर प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हापासून तो कारागृहात होता. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. चार महिन्यांपूर्वी विलासनगरात मनीषसोबत मारेकऱ्यांपैकी भारत घुगे याचा वाद झाला. त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने मनीषचा खून केल्याची बाब पुढे आली आहे. 

सविस्तर वाचा - बऱ्याच दिवसांनी मित्र घरी आल्याने घेतला सहभोजनाचा आनंद, मग घडले असे...

वर्षभरासाठी होता तडीपार 
मनीष गुप्ता याच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. दहशतीमुळे त्याला गाडगेनगर पोलिसांनी वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार केले होते. 
- शिवाजी बचाटे, 
पोलिस निरीक्षक, शहर कोतवाली ठाणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth murdered at chitra Chowk in Amravati