ऑनलाइन फ्रेण्डशिपमध्ये गुरफटलीय तरुणाई!

अनिल कांबळे
सोमवार, 18 मार्च 2019

नागपूर - अश्‍लीलता पसरविणाऱ्या वेबसाइट आणि फ्रेण्डशिप क्‍लबच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या मोबाईल क्रमांकावरून मैत्री करण्यात तरुणाई गुरफटली आहे. अनेकजण फोनवरून तरुणींच्या जाळ्यात फसत आहेत. तरुणींकडून पोलिसांत तक्रार करण्याच्या धमक्‍या तसेच आर्थिक फसवणूक केली जात आहे. असे अनेक प्रकार राज्यभरात उघडकीस येत आहेत.

नागपूर - अश्‍लीलता पसरविणाऱ्या वेबसाइट आणि फ्रेण्डशिप क्‍लबच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या मोबाईल क्रमांकावरून मैत्री करण्यात तरुणाई गुरफटली आहे. अनेकजण फोनवरून तरुणींच्या जाळ्यात फसत आहेत. तरुणींकडून पोलिसांत तक्रार करण्याच्या धमक्‍या तसेच आर्थिक फसवणूक केली जात आहे. असे अनेक प्रकार राज्यभरात उघडकीस येत आहेत.

युवक आणि युवतींच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि स्वस्त झालेले इंटरनेट यामुळे तरुणाई अश्‍लीलतेकडे वळली आहे. जाहिरातींमध्ये तसेच काही मोबाईल नंबर दिले जातात. अनेक आंबटशौकीन फोनवरून तरुणींशी मैत्री करतात. त्या तरुणी काही दिवसांपर्यंत गोड-गोड बोलतात. त्यानंतर खासगी क्रमांक देऊन व्हॉट्‌सॲपवर चॅटिंग करतात. चॅटिंगसह अनेक वेळा व्हिडिओ कॉल करण्यासाठी काही रक्‍कम बॅंक खात्यात जमा करण्यास सांगतात. पैसे टाकल्यानंतर ती युवती व्हिडिओ कॉलवर बोलण्यास सुरुवात करते. त्यानंतर अर्धनग्न फोटो पाठविण्यासाठी विचारणा केली जाते. त्यासाठी पुन्हा बॅंक खात्यात पैसे टाकण्यास भाग पाडतात.  पुन्हा पैसे टाकल्यानंतर अश्‍लील फोटो पाठविण्यास सुरुवात होते. अशाप्रकारे अनेक तरुण अशा प्रकारात अडकतात. या तरुणी जास्त पैशाची मागणी करतात. पैसे देण्यास नकार दिल्यास पोलिसांत तक्रार करण्याची धमकी तरुणी देतात, अशी माहिती एका प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या तरुणाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘सकाळ’ला दिली. 

अभियंत्याला दीड लाखाने गंडा
सक्‍करदरातील एका आंबटशौकीन सेवानिवृत्त अभियंत्यांसोबत एका तरुणीने फ्रेण्ड्‌स क्‍लबमधून मैत्री केली. त्यांना भेटण्यासाठी खात्यात १० हजार रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर तिने व्हॉट्‌सॲपवर स्वतःचे न्यूड फोटो पाठवले. त्यानंतर तिने स्वतःच्या खात्यात त्या अभियंत्याकडून जवळपास एक लाख ४० हजार रुपये वळते करण्यास सांगितले. त्यानंतर तिने मोबाईल स्विच ऑफ केला. 

पैसे कमविण्याचे आमिष
फ्रेण्डशिप करा आणि हमखास दहा हजारांहून अधिक कमवा, अशा आशयाची जाहिरात केली जाते आणि केवळ मोबाईल क्रमांक दिला जातो. या क्रमांकावर संपर्क साधल्यास पाचशे ते हजार रुपयांपर्यंत एंट्री फी आकारली जाते. यानंतर आंबटशौकिनांचा संवाद सुरू होतो. पैसे आणि शौकही पूर्ण होईल, अशा आशेने अनेक आंबटशौकीन या चक्रव्यूहात अडकतात.

मेंबरशिपनंतर काय होते?
मेंबरशिपचे पाचशे ते हजार बॅंकेत टाकल्यानंतर तुम्हाला गोड आवाजात एका तरुणीचा फोन येतो. सुरुवातीला अश्‍लील संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यानंतर शहरातील एजेंटची भेट घेण्यास सांगितले जाते. तसेच आंबटशौकिनांच्या घरी सर्व्हिस देण्याची तयारी दर्शविलिी जाते. मात्र, त्यापूर्वी बॅंकेत पैसे टाकण्यास सांगितले जाते. एकदा पैसे टाकले की, फोन बंद करून गंडा घातला जातो.

Web Title: The youth in the online friendhood