"युवाशक्ती'चे वैनगंगेत अर्धदफन आंदोलन

 पवनी : नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करताना युवाशक्तीचे कार्यकर्ते
पवनी : नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करताना युवाशक्तीचे कार्यकर्ते

पवनी (जि. भंडारा) : जिल्ह्यासाठी संजीवनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नाग नदीच्या सांडपाण्यामुळे दूषित होत आहे. त्यामुळे शेकडो गावे प्रभावित झाली आहेत. नागरिकांना जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत आहे. गेल्या दहा वर्षांपासून सतत आंदोलन करूनही वैनगंगा प्रदूषणमुक्त झाली नाही. त्यामुळे पुन्हा शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी दुपारी युवाशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करून अनोखा निषेध नोंदविला. नायब तहसीलदार हेमंत कांबळे यांना निवेदन सोपविण्यात आले.
पवनी तालुक्‍यात हजारो हेक्‍टर शेतीला वरदान ठरणारा गोसेखुर्द प्रकल्प बांधण्यात आला. या प्रकल्पात 2009पासून पाणी साठविणे सुरू आहे. धरणामध्ये नागपूर शहरातील मलमूत्रयुक्‍त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता कन्हान नदीमार्गे वैनगंगा नदीच्या पात्रात सोडले जाते. हे दूषित पाणी धरणात येऊन जमा होते. दररोज सुमारे 420 दशलक्ष लिटर प्रतिदिन प्रदूषित पाणीसाठा धरणात येतो. धरणातील पाण्यात विषारी घटक वाढले. पाण्यामधील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे मासे उत्पादनावरसुद्धा विपरीत परिणाम झाला आहे. धरणातील संपूर्ण पाणी काळ्या रंगाचे झाले असून दुर्गंधीयुक्‍त आहे. आता हेच पाणी जनतेला प्यावे लागते. त्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ आदी रोगांचा प्रादुर्भाव अनेक वर्षांपासून होत आहे. नागनदीवर जलशुद्धीकरण करणारी यंत्रणा बसवून शुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यानंतर पाणी वैनगंगेत सोडावे. निर्मळता हरविलेल्या या नदीचे पुनरुज्जीवन व गतवैभव मिळवून देण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व देवराज बावनकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com