अनैतिक संबंधातून युवकाला जाळून मारले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

चंद्रपूर : विवाहितेशी अनैतिक संबंधातून झालेल्या खूनप्रकरणाचा उलगडा तब्बल दीड महिन्यानंतर झाला. चंद्रपुरातील लालपेठ परिसरातील झुडपात पोलिसांना मृतदेहाचा जळालेला सापळा मिळाला. मृतक वर्धा येथील रहिवासी आहे, तर आरोपी चंद्रपुरातील आहे.

चंद्रपूर : विवाहितेशी अनैतिक संबंधातून झालेल्या खूनप्रकरणाचा उलगडा तब्बल दीड महिन्यानंतर झाला. चंद्रपुरातील लालपेठ परिसरातील झुडपात पोलिसांना मृतदेहाचा जळालेला सापळा मिळाला. मृतक वर्धा येथील रहिवासी आहे, तर आरोपी चंद्रपुरातील आहे.
वर्धा येथील गुड्डू बाबाराव कदम (वय 40) नऊ ऑक्‍टोबरपासून बेपत्ता होता. त्यांच्या कुटुंबीयांनी वर्धा येथील रामनगर पोलिस ठाण्यात गुड्डू हरविल्याची तक्रार दिली. तेथील स्थानिक गुन्हे शाखेने त्याचा शोध सुरू केला. तेव्हा गुड्डूच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन चंद्रपुरातील लालपेठ कॉलरी येथे दाखवत होते. यासंदर्भात चंद्रपूर शहर पोलिसांना कळविण्यात आले. दरम्यान गुड्डूच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली. ती महिला सध्या वर्धा येथे वास्तव्याला आहे. तिला दोन मुले आहेत. ती मूळची चंद्रपूरची आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या खूनप्रकरणाचा उलगडा झाला. दीड महिन्यापूर्वी गुड्डू आणि ती चंद्रपुरात आले. तिचा मानलेला भाऊ सूरज आत्राम यांच्याकडेच थांबले. त्याच रात्री गुड्डू आणि सूरज यांच्यात वाद झाला. सूरजने गुड्डूला लालपेठ परिसरातील झुडपी जंगलात नेले. तिथे त्याचा खून केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी रॉकेल टाकून त्याला जाळूनही टाकले. गुड्डू आणि सूरज यांच्यात एका युवतीवरून सहा महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्याचाच वचपा खून करून काढला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सूरजच्या विवाहित प्रेयसीचा या खूनप्रकरणात कुठलाही सहभाग सध्यातरी दिसला नाही. मात्र तिचाही या प्रकरणात सहभाग आहे का? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: The youth was burnt to death