यवतमाळमध्ये युवकांना भाईगिरीचे वेड; हाती आली घातक शस्त्रे; गल्लीबोळात तयार होताहेत टोळ्या

Youth in Yavatmal creating gangs for crime
Youth in Yavatmal creating gangs for crime

यवतमाळ : युवकांसह विधिसंघर्षग्रस्त बालके व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. त्यातूनच त्यांच्या डोक्‍यात भाईगीरीची नशा भिनली आहे. दहशत निर्माण करण्यासाठी गल्लीबोळात टोळ्या तयार होत असून, युवकांच्या हाती घातक शस्त्रे आली आहेत.

यवतमाळ शहराला टोळीयुद्धाची पार्श्‍वभूमी आहे. "खून का बदला खून'चा थरार यापूर्वी अनेकदा शहराने अनुभवला आहे. प्रमुख टोळ्यांच्या हालचाली संथ असल्या तरी काही जण अवैध व्यवसायातून चांगलेच मालामाल झाले आहे. त्यांचा डोळा नव्याने उदयास येणाऱ्या युवकांवर आहे. 

युवकांसह विधिसंघर्षग्रस्त बालके दारू, गांजाच्या आहारी गेलेले आहेत. नशेत असताना आपण खूब मोठे भाई असल्याचा आव त्यांच्याकडून आणला जातो. मागील काही दिवसांत छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना हप्ता मागणी करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. हे चेहरे नवखे असले तरी त्यांचीही पार्श्‍वभूमी गल्लीबोळात दहशत पसरवणारी आहे. 

हप्ता मागणी करणारे पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. तर, दुसरीकडे या आठवड्यात टोळीविरोधी पथकाने भोसा परिसरातून पाच तर, प्रजापती लॉन परिसरातून खंजीर व रॉड जप्त केला आहे. दोन वर्षांपूर्वी टोळीविरोधी पथकाने शहरात छापासत्र राबवून कित्येक तलवारी जप्त केल्या होत्या. त्यामुळे टोळीविरोधी पथकाच्या दहशतीने तथाकथित गल्लीबोळातील भाई भूमिगत झाले होते.

अलीकडच्या काळात पुन्हा काही युवक आपले डोके वर काढत असल्याचे दिसते. त्यांच्या मुस्क्‍या आवळण्यासाठी पोलिसांनी ठोस पाऊल उचलणे आवश्‍यक आहे. विधिसंघर्षग्रस्त बालकांना शिक्षा होत नसल्याने गुन्हा करण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येतो. हा प्रकारही धोकादायक वळणावर जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

शस्त्र बाळगण्याची क्रेझ

कमरेत किंवा वाहनात शस्त्र बाळगण्याची क्रेझ वाढत चालली आहे. नशेत राहत असल्याने आपल्या हातून गंभीर गुन्हा घडेल, याची कोणतीही भीती त्यांना वाटत नाही. टोळक्‍याने फिरत असल्याने त्यांच्याकडून चिडीमारीही केली जाते.

रक्तपाताची भीती

टोळक्‍याने मुले मोकळ्या मैदानात दारू पितात. गांजाचा धूर सोडतात. नशेत असलेली मुले दहशत पसरविण्याच्या उद्देशाने क्षुल्लक कारणातून तलवार, चाकू व गुप्ती आदी शस्त्रे काढतात. त्यामुळे परिसरातही दहशत निर्माण होते. बिनधास्त शस्त्रे वापरत असल्याने रक्तपात घडण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com