नागपूर जिल्ह्यात २४ ते २८ मे रोजी शून्य सावली दिवस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्‍यावर दिसतो. आपली सावली आपल्यालाच दिसत नाही. यालाच शून्य सावली दिवस (झिरो शॅडो डे) म्हणतात. नागपूर जिल्ह्यातही या शून्य सावली दिवसाचा अनुभव २४ ते २८ या कालावधीत विविध तालुक्‍यांमध्ये अनुभवता येणार आहे, अशी माहिती स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ सुरेश चोपणे यांनी दिली.

नागपुरात २६ मे रोजी दुपारी १२ वाजून दहा मिनिटांनी 
नागपूर - सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्‍यावर दिसतो. आपली सावली आपल्यालाच दिसत नाही. यालाच शून्य सावली दिवस (झिरो शॅडो डे) म्हणतात. नागपूर जिल्ह्यातही या शून्य सावली दिवसाचा अनुभव २४ ते २८ या कालावधीत विविध तालुक्‍यांमध्ये अनुभवता येणार आहे, अशी माहिती स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ सुरेश चोपणे यांनी दिली. 

राज्यात २० ते ३० मेपर्यंत आणि १६ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. 

पृथ्वीचा ध्रुव २३.५ डिग्री उत्तरेकडे कलला असल्याने परिभ्रमण करताना सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायण होते. म्हणूनच सूर्य विश्‍ववृत्तापासून दक्षिणेकडे २३.५ आणि उत्तरेकडे २३.५ डिग्रीपर्यंत भ्रमण करताना दिसतो, एखाद्या अक्षांशावर सूर्याचा कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जुळते आणि शून्य सावली अनुभवता येतो. तेथील कुठल्याही वस्तूची सावली दुपारी पडत नाही. सूर्याचा अंशिक कोन मोठा असल्याने एकाच दिवशी दोन दिवस शून्य सावली दिवस पडतो. त्यामुळे मे महिन्यात तीन ते ३० मेदरम्यान आणि १५ ते २२ उत्तर अक्षांशावर महाराष्ट्रातून शून्य सावली दिवस घडतो.

ही खगोलीय घटना असली तरी मनोरंजनातून विज्ञान शिकण्यासाठी खूप उपयोगी आहे. पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्‍यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे दिसतो. पण दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र, वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवयाला मिळतो. तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते व जणू काही सावली गायब होते. 

शून्य सावलीचा हा एक रोमांचक अनुभव आहे, असे चोपणे यांनी म्हटले आहे.    

शून्य सावली दिवस कुठे कधी?
शहर        तारीख      वेळ  

भिवापूर    २४ मे    १२.०८ मिनिट, 
उमरेड    २४ मे    १२.०९ मिनिट, 
कुही    २५ मे    १२.०९ मिनिट, 
मौदा    २६ मे    १२.०९ मिनिट, 
कामठी    २६ मे    १२.१० मिनिट, 
कळमेश्वर    २६ मे    १२.११ मिनिट, 
नागपूर    २६ मे    १२.१० मिनिट, 
काटोल    २७ मे    १२.१२ मिनिट, 
पारशिवनी    २७ मे    १२.१० मिनिट, 
रामटेक     २७ मे    १२.१० मिनिट, 
हिंगणा    २७ मे    १२.१० मिनिट, 
सावनेर    २७ मे    १२.११ मिनिट, 
नरखेड    २८ मे    १२.१३ मिनिट

Web Title: Zero Shadow Day