राज्यात झिकाचा धोका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

नागपूर - नवजात बालकांच्या मेंदूची वाढ खुंटविणाऱ्या ‘झिका’ विषाणूचा प्रसार भारतात झाला आहे. जगात वर्षभरात तब्बल ४० लाख नागरिकांना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावर चर्चाही केली आहे. तमिळनाडू, गुजरात, राजस्थानमध्ये झिकाचे रुग्ण आढळल्यामुळे महाराष्ट्रातही झिकाचा धोका कायम आहे. रविवारी गायत्रीनगर, आयटी पार्क येथील कवी कुलगुरू कालिदास सभागृहात डॉ. भट्टाचार्य यांचे चर्चासत्र  होणार आहे.

या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः गर्भातच होतो. एकट्या राजस्थानमध्ये १४९ जणांना झिकाची लागण झाली असून, यातील ४० गर्भवती आहेत. इडिस इजिप्ती हाच डास झिका या विषाणूचा वाहक आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत ही कबुली दिली आहे. झिकाची लागण झालेले तीन रुग्ण गुजरात राज्यातील आहेत. यात एका गर्भवतीचा समावेश आहे. चौथा रुग्ण तमिळनाडू राज्यातील कृष्णगिरी जिल्ह्यातील आहे. 

गर्भवतींना झिकाची लागण लवकर होते. हा विषाणू शरीरात शिरला की, मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो. झिकाची लागण गर्भवतीला झाल्यास नवजात शिशूवर विपरित परिणाम होतो. गर्भातील बाळाची मेंदूची वाढ खुंटते. मंदबुद्धी बाळ जन्माला येतात. या मुलांना मिरगीचे झटके येतात. ब्राझिल येथील साओ पावलो विद्यापीठाचे न्यूरॉलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. ॲमिल्टन बरेरा यांनी संशोधनातून हा अभ्यास मांडल्याचे जागतिक दर्जाचे मेंदू रोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले. 

आरोग्य संचालकांनी दिला होता इशारा
तमिळनाडूत झिकाचा रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकारने झिकाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना आखत राज्यातील १२ ठिकाणी पाळत ठेवली होती. प्रसूतिगृह, जिल्हा रुग्णालयांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य संचालकांनी दिले होते.

ब्राझिलमध्ये २०१५ साली या आजाराचा उद्रेक झाला. त्यावेळी १७ लाख रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी ३,५०० मुलांच्या मेंदूवर झिकामुळे विपरित परिणाम झाल्याचे संशोधनातून मांडण्यात आले. जगातील ७० देशांत या विषाणूचे अतिक्रमण झाले आहे. झिकाची लागण होताच मांसपेशी निष्क्रिय करणाऱ्या गुलेन बारी सिंड्रोमची जोखीम बळावते.
- डॉ. चंद्रशेखखर मेश्राम, मेंदूरोगतज्ज्ञ, नागपूर.

झिकाची लक्षणे
ताप येणे
अंगावर पुरळ येणे
सतत अंगदुखी, असह्य डोकेदुखी
हातापायांत अशक्तपणा 

Web Title: zika risk in state