जिल्हा परिषदेला पडला मालमत्तांचा विसर; कोट्यवधींच्या जागा कोणाच्या घशात?

washim photo.jpeg
washim photo.jpeg

वाशीम : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेची लालफितशाही जिल्हा परिषदेच्या मालमत्तांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. चार वेळा सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. मालमत्तांची मोजणी करण्यासाठी समितीची स्थापना झाली. मात्र, कोणतीही कारवाई न झाल्याने जिल्हा परिषदेच्या मालमत्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. जुन्या जिल्हा परिषद परिसरात तर कोट्यवधींची जागा शहरातील धनाढ्य व्यापाऱ्यांनी बळकावली असून आता जिल्हा परिषद प्रशासनाच्या नाकावर टिच्चून पक्क्या अतिक्रमणाच्या समोरच पुन्हा कोट्यवधी रुपयांच्या जागेवर टिनाचे अतिक्रमण करून ही जागा घशात घालण्याचा डाव आखला आहे.

जिल्ह्यामध्ये मंगरूळपीर, शेलुबाजार, वाशीम, नंधाना येथे जिल्हा परिदेच्या मालकीच्या कोट्यवधींच्या जागा आहे. येथील जुन्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये तब्बल 20 एकर जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा आहे. या जागेतून जिल्हा परिषदेचे कामकाज नवीन इमारतीत स्थानांतरीत झाल्यानंतर ही इमारत ग्रामीण पोलिस ठाण्याला भाडेतत्त्वावर दिली आहे. मात्र, या इमारतीच्या दक्षिण बाजूने आधीच वाशीम शहरातील एका माजी नगरसेवकाने पक्के बांधकाम करून 20 वर्षापासून अतिक्रमण केले आहे. जिल्हा परिषद प्रशासन काहीच कारवाई करीत नसल्याने आता अतिक्रमण करणार्‍यांचे धैर्य वाढल्याने दक्षिणेच्या प्रवेशद्वाराजवळ टिनाचे मोठे अतिक्रमण करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करण्याचे धोरण स्वीकारल्याने अतिक्रमणाला अभय कुणाचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सर्वसाधारण सभेच्या ठरावाची वासलात
दोन वर्षापूर्वी ‘सकाळ’ ने जिल्हा परिषदेच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर सर्वसाधारण सभेत याची चर्चा होऊन मालमत्तांची मोजणी करण्याचा ठराव झाला होता. यासाठी वित्तविभागातील एका अधिकाऱ्याची नेमणुकही केली होती. तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी कापडे यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्यापर्यत कारवाई केली होती. मात्र, नंतर या जागेवरील अतिक्रमणाला पाठबळ देणाऱ्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा मुद्दा बासनात गुंडाळून ठेवला. मात्र, कोट्यवधीची जागा अतिक्रमणात जात असताना वरिष्ठ अधिकारी डोळेलावून बसल्याचे चित्र समोर आले आहे.

वीज वितरणच्या केंद्राचे गौडबंगाल
जुनी जिल्हा परिषद परिसरामध्ये शहरातील वीज सुरळीकरणासाठी उपकेंद्र उभे झाले होते. या उपकेंद्रासाठी जिल्हा परिषदेच्या जागेचा ठराव घेण्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये रणकंदन झाले होते. मात्र, तत्कालीन जिल्हाधिकारी व तत्कालीन लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत उपकेंद्राला दिली होती. मात्र आता या उपकेंद्रावर ‘कोल्हटकरवाडी’ उपकेंद्र असे नाव असल्याने व कोल्हटकरवाडी शहरात या केंद्रापासून दोन किलोमिटर अंतरावर असल्याने या उपकेंद्राच्या जागेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

आढावा घेऊन कारवाई
जिल्हा परिषदेच्या जागेवरील अतिक्रमणासंदर्भात मागील सर्वसाधारण सभेमध्ये ठराव झाला होता. याबाबत आता जिल्हा परिषदेच्या जागेवर झालेले अतिक्रमण व केलेले कारवाई याचा आढावा घेऊन कारवाई केली जाईल.
-चंद्रकांत ठाकरे, अध्यक्ष जिल्हा परिषद, वाशीम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com