
गोंदिया ZP : मतदारांनी मातब्बर नेत्यांना नाकारलं, नव्या चेहऱ्यांना पसंती
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या ५३ गट आणि पंचायत समितीच्या १०६ गणासाठी घेतलेल्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (ता. १९) जाहीर झाला. या निवडणुकीत विजयाची माळ आपल्याच गळ्यात पडेल, या आविर्भावात असलेल्या मातब्बर नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मतदारांनी बहुतेक नव्या चेहऱ्यांना संधी देत त्यांच्यासाठी मिनी मंत्रालयाची दारे खुली करून दिली. सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा जिल्हा परिषद क्षेत्रातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, तिरोडा तालुक्यातील सेजगाव जिल्हा परिषद क्षेत्रातून राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, आमगाव तालुक्यातील गोरठा जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांचे पूत्र हरिहर मानकर, गोरेगाव तालुक्यातील सोनी जिल्हा परिषद क्षेत्रातून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव पी. जी. कटरे, शहारवाणी जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपचे माजी सभापती मोरेश्वर कटरे यांचा पराभव झाला.(Zilla Parishad Gondia Panchayat Samiti election)
हेही वाचा: भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांची बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्केओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने पहिल्या टप्प्यात म्हणजे, २१ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी तसेच पंचायत समितीच्या ८६ गणासाठी निवडणूक घेण्यात आली. दरम्यान, ओबीसींच्या जागा सर्वसाधारण करून निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्याने दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या १० जागा आणि पंचायत समितीच्या २० गणांसाठी मंगळवारी (ता. १८) निवडणूक घेण्यात आली. तथापि, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या निवडणुकीत मातब्बर नेत्यांना मतदारांनी पराभवाचे चटके दिले.
हेही वाचा: राज्याला दिलासा! दोन आठवड्यात ठरणार OBC आरक्षणाचं भवितव्य
उल्लेखनीय म्हणजे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचा गड असलेल्या डव्वा जिल्हा परिषद क्षेत्रात या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला बाजूला सारून भाजपला संधी दिली. भाजपचे डाॅ. भूमेश्वर पटले निवडून आले. डव्वा जिल्हा परिषद क्षेत्राच्या निकालाकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून होते. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, भारतीय जनता पक्षाकडून डॉ. भुमेश्वर पटले, काँग्रेसकडून दिनेश हुकरे रिंगणात ऊभे होते. खरी लढत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच होती. परंतु, काँग्रेसचे दिनेश हुकरे यांनी निवडणुकीत चुरस निर्माण केली. अखेर चुरशीच्या या सामन्यात भाजपचे डाॅ. भूमेश्वर पटले विजयी झाले. येथून गंगाधर परशुरामकर यांनी दोनवेळा, किरण गावराने यांनी एक वेळ प्रतिनिधित्व केले आहे.
या क्षेत्रातून भाजपने विजय मिळविला नव्हता, हे विशेष. तिरोडा तालुक्यातील सेजगाव जिल्हा परिषद क्षेत्रातून राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यात. येथे भाजपचे प्रवीण किशोरीलाल पटले विजयी झाले. त्यांनी काॅंग्रेसचे उमेदवार ओमप्रकाश राधेलाल पटले यांचा पराभव केला. गोरठा जिल्हा परिषद क्षेत्रातून काँग्रेसच्या छबूताई महेश ऊके विजयी झाल्यात. त्यांनी भाजपचे हरिहर केशवराव मानकर यांचा पराभव केला. गोरेगाव तालुक्यातील सोनी जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपचे पंकज रहांगडाले विजयी झाले. त्यांनी काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव पी. जी. कटरे यांचा पराभव केला. शहारवाणी जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपचे माजी सभापती मोरेश्वर कटरे यांचा पराभव झाला. येथे काँग्रेसचे जितेंद्र कटरे विजयी झाले. एकंदरीत मतदारांनी दिग्गज नेत्यांना नाकारून नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसते. दुसरीकडे चावी संघटन व प्रहार संघटनेनेही आपले खाते उघडले आहे.
Web Title: Zilla Parishad Gondia Voters Reject Wealthy Leaders Prefer New Face
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..