अतिरिक्त मुख्याधिकारी करणार विदेशवारीची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नागपूर - कंत्राटदारांसोबत विदेशवारीवर गेलेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी अतिरिक्त मुख्याधिकारी अंकुश केदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई व वित्त व लेखा अधिकारी अमित अहिरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.  निष्पक्ष चौकशीसाठी यातून बांधकाम विभागाच्या प्रमुखांना वगळण्यात आले आहे.

नागपूर - कंत्राटदारांसोबत विदेशवारीवर गेलेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी अतिरिक्त मुख्याधिकारी अंकुश केदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई व वित्त व लेखा अधिकारी अमित अहिरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.  निष्पक्ष चौकशीसाठी यातून बांधकाम विभागाच्या प्रमुखांना वगळण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेचे कर्मचारी कंत्राटदारांसोबत विदेशवारीवर गेले होते. तेथे मौजमजा करतानाचे व्हिडिओ, फोटो व्हायरला झाले. यात कर्मचारी व कंत्राटदारांसोबत मौजमजा करताना दिसत आहे. संबंधित वृत्त प्रकाशित होताच जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ उडाली होती. विदेशवारीवरून परत येताच सर्व कर्मचाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजावून जिल्हा परिषदेने त्यांचे स्वागत केले होते. त्यानंतर मुख्याधिकारी चौकशी समिती नेमली. आज समितीने पुन्हा नव्याने चौकशीला  प्रारंभ केला. काही जणांचे जबाब नोंदवले. सर्वांचे बॅंक स्टेटमेंटची पाहणीही केली. 

विदेशवारी वारीत जि. प.मध्ये कार्यरत एकूण २२ कर्मचारी होते. त्यात दोन सेवानिवृत्तांसह बांधकाम विभागातील दोन चपराशांचाही समावेश होता.  बांधकाम विभागासह  लघु सिंचन, कृषी, पंचायत, नरेगा, शिक्षण विभागासोबतच पंचायत समिती कुही व हिंगणा येथील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. 

बांधकाम विभागातील आठही कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वीच विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढला होता. त्यासाठी त्यांनी  विभागप्रमुखांची परवानगी घेतली होती. सर्वांनी सुटीसाठी  सारख्याच तारखा अर्जात टाकल्या होत्या.  त्यामुळे कर्मचारी विदेशात जाणार असल्याची माहिती विभागप्रमुखांना होती असा तर्क काढल्या जात आहे.

कार्यकारी अभियंत्यास समितीतून वगळले
बांधकाम विभागाच्या प्रमुखांच्याच आदेशाने कर्मचारी विदेशवारीवर गेले होते. त्यामुळे  थातूरमातूर चौकशी करून आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना वाचविण्याच येईल अशी शंका व्यक्त केली जात होती. ‘सकाळ’ने आशीर्वाद देणाऱ्यांवरच चौकशी सोपविण्यात आली  असल्याने चौकशी समितीवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर बांधकाम विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता ठाकरे यांना समितीतून वगळण्यात आले आहे. 

Web Title: zp employee foreign tour inquiry