शाळांचे होणार ‘सेफ्टी ऑडिट’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

नागपूर - जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या इमारती जुन्या असून, मोडकळीस आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शाळालगतच विजेच्या तारा असल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यूही झाला आहे. शाळांमध्ये झालेल्या घटना लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्यात येणार आहे.

नागपूर - जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या इमारती जुन्या असून, मोडकळीस आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शाळालगतच विजेच्या तारा असल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यूही झाला आहे. शाळांमध्ये झालेल्या घटना लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या १,५३९ शाळा असून, यात ७२ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हिंगणा तालुक्‍यातील दाभा तांडा आणि रामटेक तालुक्‍यातील जुनेवाणी येथील विद्यार्थ्यांचा शॉक लागल्याने मृत्यू झाला होता. विजेच्या तारा शाळा इमारतीलगत आहे. खेळता-खेळता विद्यार्थ्यांचा स्पर्श तारांना झाल्याने मृत्यू झाला. यामुळे अशा घटना इतर ठिकाणी होण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे. अशा घटना पुन्हा होणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक इमारती पडण्याच्या स्थितीत आहे. इमारती पडल्यास मोठी हानी होण्याची भीती आहे. त्यामुळे या शाळांच्या इमारतींचेही स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येत आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचे ऑडिट होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि वीज विभागाच्या माध्यमातून हे ऑडिट करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. शाळांमध्ये झालेल्या घटना पाहता सेफ्टी ऑडिट करण्याची सूचना केली आहे. त्याचप्रमाणे आरोग्यसंदर्भातील ऑडिटसुद्धा करण्याची सूचना केली आहे. शाळेत शौचालय आहे की नाही? काय स्थिती आहे? पिण्याची पाण्याची काय व्यवस्था आहे? याचीही माहिती मागविली आहे. यानंतर आवश्‍यक ठिकाणी बांधकाम करण्यात येणार असून, विजेच्या तारा हलविण्यास सांगण्यात येईल.
- संजय यादव, सीईओ, जिल्हा परिषद.

Web Title: ZP School Safety Audit