Eknath Shinde यांच्या हत्येचा कट नक्षल्यांकडून रचण्यात आला, सुहास कांदेंचा आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला नक्षल्यांकडून धोका असतानाही तत्कालीन शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली नाही, असा आरोप शिवसेनेच्या बंडखोर गटातील मनमाडचे आमदार सुहास कांदेंनी केला. त्यांच्या या आरोपावरुन आता राज्यातलं राजकारण चांगलंच तापताना दिसतंय.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी मर्यादित पोलीस व्यवस्था असावी, अशा सूचना गृहखात्याला केल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी रस्तेप्रवासावेळी असणारा प्रोटोकॉलही नाकारला त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चांगलीच वाहवा झाली. एकीकडे खुद्द एकनाथ शिंदे सुरक्षा कमी करत असतानाच आता त्यांच्या जुन्या प्रकरणाची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झालीए. आता याची क्रोनोलॉजी समजून घेऊयात...
महाविकासआघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असणारे एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्याकाळात गडचिरोलीतील विकासकामांसंदर्भात एकनाथ शिंदेंनी अनेक निर्णय घेतलेले. तिथल्या पूरस्थितीतही एकनाथ शिंदेंनी गडचिरोलीचा दौरा केला होता. याच काळात एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं होतं. त्यात फक्त एकनाथ शिंदेच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेचं प्रकरण आताच का समोर आलं? तर शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर कसा अन्याय झाला हे सांगण्यासाठी बंडखोर आमदार सुहास कांदेंनी एकनाथ शिंदेच्या सुरक्षेचा मुद्दा उकलून काढलाय. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांच्या जीवाला धोका होता. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुरक्षा नाकारल्याचा आरोप कांदेंनी केला.
Web Title: Eknath Shinde Murder Was Hatched By Naxalites Suhas Kande Alleged
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..