World News Update | G20, फिफा वर्ल्ड कप ते हुकूमशहाची थेट अमेरिकेला धमकी, सगळ्या बातम्या इथेच पाहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

World News Update | G20, फिफा वर्ल्ड कप ते हुकूमशहाची थेट अमेरिकेला धमकी, सगळ्या बातम्या इथेच पाहा

Published on : 20 November 2022, 3:30 pm

इकडे भारत जोडो यात्रा, सावरकर वाद, जितेंद्र आव्हाडांना अटक-जामीन प्रकरण सुरु असताना जगभरात काय घडत होतं? ते जाणून घेऊयात या व्हिडीओतून-

जी २० समिट

सर्वात महत्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यात १५ आणि १६ नोव्हेंबरला इंडोनेशियातील बालीत जी २० समिट झाली. इथे पंतप्रधान मोदींनी रशियाकडून आयात करणाऱ्या कच्च्या तेलावरुन निर्बंधमुक्त ऊर्जापुरविठ्याचं समर्थन केलं. जागतिक हवामान बदल, कोरोनाचा संसर्ग, युक्रेन युद्ध अशा अनेक जागतिक समस्यांचा सामना सर्व देशांना करावा लागत आहे. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. तरी, संपूर्ण जगाला ‘जी२०’ गटाकडून खूप अपेक्षा असल्याचं मोदींनी बोलून दाखवलं.

बांगलादेशातही श्रद्धा वालकर हत्येसारखीच घटना

सर्वात आधी ज्या श्रद्धा वालकर हत्येनं देशात खळबळ माजली आहे. अशीच घटना आपल्याशेजारील बांगलादेशात घडली आहे. तिथेही अबू बकर नावाच्या मुस्लिम तरुणानं कविता राणी या हिंदू मुलीची निर्घृण हत्या केली आहे. विशेष म्हणजे कविता आणि अबूची ४-५ दिवसांपूर्वीच भेट झाली होती. तर तो अबूची आधी लिव्ह-इन-पार्टनर होती. पण तिला सोडून अबूचे कवितासोबत तार जुळले. त्यानंतर अबूनं तिचा काटा काढला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन तिला नाल्यात फेकून दिलं. तर, धडापासून डोकं वेगळं करून पॉलिथिनमध्ये पॅक करून भाड्याच्या घरात ठेवलं. याप्रकरणी पोलिसांनी अबूसह त्याची लिव्ह-इन पार्टनर सपनाला अटक केलीय.

किम जोंग उनची मुलगी पहिल्यांदाच जगासमोर

सर्वात महत्वाचं म्हणजे उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनच्या मुलीची पहिली झलक पाहायला मिळाली. शनिवारी उत्तर कोरियानं इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी केली. यावेळी किम जोंग उन पहिल्यांदाच आपल्या लेकीसोबत कॅमेऱ्यात कैद झाला.

याचवेळी घडलेली घटना म्हणजे किम जोंगनं अमेरिकेसह मित्रपक्षांना दिलेली धमकी.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उननं जगाला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिलीय. अमेरिकेची दबावाची रणनीती आणि दक्षिण कोरिया-जपानच्या प्रदेशातील त्यांच्या वृत्तीला प्रत्युत्तर म्हणूनच क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचं उत्तर कोरियाच्या लष्करानं सांगितलं. तर, अमेरिकेनं हल्ला केल्यास उत्तर कोरियाही अण्वस्त्र हल्ला करेल, असा इशारा किमनं अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना दिलाय.

आर्थिक मंदीचं संकट

ब्रिटनमध्ये आर्थिक मंदीचं संकट कोसळलंय कारण अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी नुकताच आणीबाणीचा अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी करांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचं दिसतंय. कररचनेतही मोठे बदल केलेले आहेत. त्यामुळे नव्यानेच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक या संकटातून कसा मार्ग काढतात, याकडे जगाच्या नजरा लागलेल्या आहेत. विशेष म्हणजे देशावरील अर्थसंकटामुळेच माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.

तर आपल्याशेजारील श्रीलंकेतही महागाई, आर्थिक मंदीनं उच्चांक गाठलाय. तिथे सत्तापालट झाला असला तरी लोकांच्या दैनंदिन जीवन अजूनही सुरळीत झालेलं नाही. तिथे अजूनही लोक रस्त्यावर उतरुन सरकारच्या निर्णयांचा निषेध करताहेत.

फिफा वर्ल्ड कपशी संबंधित कतारमधील नियमावली

एकीकडे फिफा वर्ल्ड कप कतार या मुस्लिम देशात होत आहे. त्यामुळे तिथे आधीच कपड्यांपासून मद्यापर्यंत नियमावली लागू करण्यात आली आहे. म्हणजे कतारमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आता खांद्यापर्यंत बाह्या असणारे कपडे आणि गुडघ्याच्या खालपर्यंत पँट वापराव्या लागणार आहेत. शिवाय स्टेडिअममध्ये ‘टी-शर्ट’ काढण्यास बंदी असणार आहे. या नियमाचा फटका खेळाडूंनाच बसण्याची शक्यता आहे. कारण गोल केल्यावर किंवा सामना संपल्यावर ‘टी-शर्ट’ काढणे हे फुटबॉलमध्ये सर्रास होत असते. या स्पर्धेत खेळाडूंना मात्र सावधगिरी बाळगावी लागणार आहे. त्यामुळे यंदाचा फिफा वर्ल्ड कप हा खेळ सुरु होण्याआधी कतारमधील नियमावलीमुळे चांगलाच चर्चेत आलाय.

आपल्या राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना आंतरराष्ट्रीय विश्वात या घडामोडी घडल्यात. तरी, अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी सकाळच्या वेबसाईटवरील ग्लोबल सेक्शनला नक्की भेट द्या आणि युट्युब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.