esakal | जाईन गे माये, आळंदीये तया, पारणे फेडाया डोळियांचे
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदी (ता. खेड) - पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी विविध खेळांमध्ये दंग झालेले वारकरी.

जाईन गे माये, आळंदीये तया, पारणे फेडाया डोळियांचे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आळंदीत राज्यभरातील वैष्णवांची गर्दी

आळंदी - माउलींचा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणारा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी आळंदीत इंद्रायणी तीरी वैष्णवांची गर्दी झाली होती. इंद्रायणीचा तीर आणि अवघी अलंकापुरी टाळमृदंगाचा गजर आणि ‘माउली’ नामाच्या अखंड जयघोषाने दुमदुमून गेली. 

जाईन गे माये, आळंदीये तया,
पारणे फेडाया डोळियांचे,
वेणीच्या झाडणी झाडीन चरण,
दृष्टी उतरीन प्राणांचिया...

ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत अवघ्या महाराष्ट्रातून निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा आळंदीत दाखल झाला. सावळ्या विठुरायाची ओढ असल्याने व घराण्यात परंपरेने चालत आलेली आपली वारी विठुराया चरणी समर्पित करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा मेळा आळंदीत जमला होता.

टाळमृदंगाचा निनाद अन्‌ ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा अखंड जयघोष कानी पडत होता. माउलींच्या प्रस्थान सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून अनेक छोट्यामोठ्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. रथापुढे २७ दिंड्या, रथामागे २०१ आणि तात्पुरते नंबर दिलेल्या सुमारे तीनशेहून अधिक दिंड्या वारीत सहभागी होण्यासाठी आळंदीत गेल्या चार दिवसांपासून आल्या होत्या. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी सुमारे सव्वा लाख भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. गोपाळपुरा, प्रदक्षिणा रस्ता, इंद्रायणी घाट भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. 

शहरात सकाळपासूनच ठिकठिकाणी राहुट्यांमधून वारकऱ्यांच्या टाळमृदंगाचा जयघोष, हरिनामाचा गजर, ज्ञानेश्‍वरी पारायणे सुरू होती. वैष्णवांच्या या अलोट गर्दीने संपूर्ण इंद्रायणी परिसर गजबजून गेला होता. इंद्रायणी तीरी वारकऱ्यांचे खेळ रंगले होते. घाटावर विविध दिंड्या भजन, भारूड अन्‌ माउलींचा जयघोष करत होत्या. भक्तिरसात तल्लीन झालेल्या महिला-पुरुष वारकरी आनंदाने हातात हात घेत फुगड्या खेळत होते.

पुंडलिक मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता. विशेष करून महिलांमध्ये उत्साह होता. मंदिरामध्येही महिला भाविकांनी फुगड्यांचे फेर धरले होते. दर्शनबारीतून महिला देवाची अभंगवाणी गाऊन तल्लीन झाल्या होत्या. साधारण दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर दर्शन होत होते. इंद्रायणीवर स्नानासाठी भल्या पहाटे गर्दी जमली होती. इंद्रायणीला मुबलक पाणी असल्याने भाविकांची चांगली सोय झाली. स्नानानंतर भाविकांची पावले माउलींच्या समाधी दर्शनासाठी वळत होती. देवस्थानच्या नव्या दर्शनबारीत व्यवस्था करण्यात आली होती. दर्शनाची रांग भक्ती सोपान पुलावरून नदीच्या पलीकडे वळविण्यात आली होती. दर्शन झाल्यानंतर महाद्वारातून भाविक बाहेर पडत होते.

पावसामुळे वारकरी खूष
वारीतील वारकऱ्यांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र कमी जाणवत होती. शेतकऱ्यांचा राज्यभरातील संप आणि त्यानंतर रखडलेल्या मशागतीच्या कामांमुळे वारीतील गर्दीवर परिणाम जाणवत होता. गेले तीन-चार दिवस हवामान ढगाळ होते. आज मात्र सकाळपासून स्वच्छ सूर्यप्रकाश होता; मात्र उकाडा जाणवत होता. गेल्या आठवडाभरात पाऊस चांगला झाल्याने वारीसाठी आलेला शेतकरीवर्ग खूष होता.

loading image