संततधारेत संतांची मांदियाळी पंढरीत

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह सकल वैष्णवांची मांदियाळी भूवैकुंठी अवतरली
Ashadhi wari 2022 Sant Dnyaneshwar Maharaj Saint Tukaram Maharaj palkhi at pandharpur
Ashadhi wari 2022 Sant Dnyaneshwar Maharaj Saint Tukaram Maharaj palkhi at pandharpur sakal

पंढरपूर : भेटी लागे जिवा लागलेसे आस, पाहे रात्रंदिन वाट तुझी, ही आर्तता संपवून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पालखी आणि त्यांच्यासमवेत आलेले लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले. देवभूमी पंढरीत पाऊल ठेवताच हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराला जोर चढला होता. नाचत नाचतच वैष्णवांनी अवघी पंढरी व्यापून टाकली. एकवीस दिवसांची पायी वाटचाल करीत आलेल्या दोन्ही सोहळ्यातील वारकऱ्यांनी पंढरीत येताच आनंदाचे डोही आनंद तरंग, अशीच अवस्था अनुभवली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह सकल संतांच्या पालख्यांनी वाखरीचा तळ भरून गेला होता. अनेक संतांच्या पालख्यांसमवेत आलेल्या वारकऱ्यांनी तळावर माउलींच्या तसेच तुकोबारायांच्या दर्शनासाठी लांबच लांबा रांगा लावल्या होत्या. माउलींच्या पालखी सोहळ्यात पहाटे महापूजा सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे यांच्या हस्ते झाली. पंढरपुरात ट्रक लवकर जाण्यासाठी तळावर सकाळी नऊ वाजल्यापासूनच दिंड्यांमध्ये भोजन सुरू होते. लवकर भोजन उरकून ट्रक पुढे देऊन वारकरी तळावर थांबून होते. दुपारी दीड वाजता माउलींची पालखी पंढरीकडे मार्गस्थ झाली. पहाटेपासूनच पावसाचा जोर होता. आज पंढरीत जाऊन आपली वारी रुजू होणार असल्याच्या आनंदाने वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. पालखी वाखरीजवळील भाटे मळ्याजवळ गेल्यानंतर ती परंपरेप्रमाणे भाटे यांच्या रथात ठेवण्यात आली. त्यानंतर वडार समाजाच्या भाविकांना भाटे यांचा रथ ओढण्याची परंपरा आहे. त्यानुसार माउली नामाचा जयघोष करीत माउलींची पालखी या रथात वीसबावीजवळ पोचली.

तेथे माउलींचा सोहळा शेवटच्या उभ्या रिंगणासाठी थांबला. दिंड्यांमध्ये दोन भाग करून रिंगण आखण्यात आले. पुढील दिंड्यांमधून दोन्ही अश्वांनी नेत्रदीपक धावत रथाच्या मागे गेले. तेथून पुन्हा रथाजवळ आले. तेथे अश्वांना नारळ प्रसाद दिला. तेथून पुन्हा अश्व धावत पुढे गेले. यावेळी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे, विश्वस्त अभय टिळक, मानकरी ऊर्जितसिंह शितोळे सरकार, राजाभाऊ आरफळकर, बाळासाहेब चोपदार, उद्धव चोपदार उपस्थित होते. त्यानंतर परंपरेप्रमाणे सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी माउलींच्या पादुका मानकरी ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात देण्यात आल्या. त्यांच्या उजव्या बाजूला गोपाळ महाराज वासकर आणि डावीकडे राजाभाऊ आरफळकर होते. तेथून पादुका चालत पंढरपूरमध्ये आणल्या. नाथ चौकात समाजआरतीनंतर पादुका ज्ञानेश्वर महाराज मंदिरात विराजमान करण्यात आल्या.

तुकोबारायांचे रिंगण रंगले

वाखरी येथील तळावर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा वाखरी ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आली. दुपारी एक वाजता देहूकर मालकांच्या सूचनेनुसार चोपदारांनी तुकोबारायांचा सोहळा पंढरीकडे मार्गस्थ केला. हरिनामाचा गजर करीत सोहळा पादुका मंदिर वीसबावीपाशी आला. तेथे सोहळ्यातील शेवटच्या उभे रिंगणासाठी रथ थांबला. चोपदार नामदेव गिराम व अन्य चोपदारांनी रिंगण लावून घेतले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे, सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त बाळासाहेब मोरे, संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे, माजी अध्यक्ष बापूसाहेब मोरे, सुरेश मोरे, माजी विश्वस्त प्रल्हाद मोरे, पंढरीनाथ मोरे, विश्वजित मोरे, रामभाऊ मोरे, सूर्यकांत मोरे उपस्थित होते. चोपदारांनी लावलेल्या रिंगणात स्वाराचा आणि तुकोबारायांचा अश्वाने बेफाम दौड लावत उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आरती झाल्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाला. तुकोबारायांचा सोहळा संत तुकाराम महाराज मंदिरात रात्री संत तुकाराम महाराज मंदिरात विसावला. यावेळी विणेकऱ्यांची हजेरी चोपदार नामदेव गिराम यांनी घेतली.

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील लाखो वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्फत पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले, की आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे आलेल्या सर्व भाविकांना शुभेच्छा. लाखो भाविक पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. आपली विठ्ठलावर निस्सीम भक्ती आहे. अनेक शतकांपासून पंढरपूरच्या वारीची परंपरा असून ती जगातील सर्वात जुनी आणि मोठी आहे. महाराष्ट्रातील वारकरी चळवळ ही आपल्या समृद्ध संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतिनिधित्व करते. या वारकरी प्रथेने समरसता आणि समतेवर भर दिला आहे. प्रत्येकाचे मार्ग, आचार आणि विचार भिन्न असले तरी ध्येय एकच असल्याचे दिंडीची परंपरा सांगते.

माझी पंधरा वर्षाची वारी आहे. वारी म्हणजे सुखसोहळा आहे. कोरोनाकाळात वारी न झाल्याने आपल्याकडील काहीतरी हरवले असे वाटायचे. डोळ्यांत विठ्ठलाच्या आठवणीने पाणी यायचे. आता वारी सुरू झाली, याचा आनंद आम्ही रिंगणात उड्या, खेळ खेळून व्यक्त केला.’’

- सत्यभामा आखतरे, रा. आखराई, जि. लातूर

मागील पाच सहा वर्षे वारी केली होती. दोन वर्षे कोरोनामुळे वारी न झाल्याने करमले नाही. वारीला जावे असे वाटायचं. आम्ही दोघे कोरोनाने आजारी होतो, तेव्हा ठरवलं यंदा वारी करायची. गुडघे दुखत असून आम्ही वारीत आलो. आनंद वाटतोय.’’

- तारामती फड, रा. आखरवाई जि. परभणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com