वारीला जाताय? मग पंढरपूरातील 'या' 8 ठिकाणी भेट द्यायलाच हवी

पंढरपूरात भेटी देण्यासारखे अनेक ठिकाणे आहेत.
Pandharpur
PandharpurSakal

तुम्ही जर का आषाढी एकादशी करता वारीत निघाला असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल मी वारीला चाललो पण पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाच दर्शन झाल्यावर नेमक्या कोणत्या कोणत्या ठिकाणी जायचं? हा प्रश्न प्रत्येक वारकरी मायबापाला पडतो तेव्हा तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही आज प्रयत्न करणार आहोत.

पांडुरंगाचे आणि रखुमाईचे दर्शन झाले की तुम्ही लगेच परतीच्या प्रवासाला निघू नका. कारण दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरला काही मुख्य अशी ठिकाणे आहेत जिथं तुम्ही भेट दिलीच पाहिजे. चला तर मग बघू या पंढरपूरमधील प्रमुख आठ ठिकाणे जिथं तुम्ही गेलच पाहिजे..

1) लोहदंड तीर्थ

लोहदंड तीर्थ चंद्रभागेच्या पात्रात पुंडलिकाच्या मंदिरासमोर आहे. विशेष म्हणजे इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. या तीर्थात स्नान केल्याने इंद्राच्या अंगावरील सहस्त्र छिद्रे गेली आणि इंद्राच्या हातातील लोहदंड या तीर्थात तरंगला अशी आख्यायिका आहे.

2) नामदेव पायरी

अशी आख्यायिका सांगतात की संत नामदेवांनी श्री पांडुरंगाला सांगितले की, "हे भगवंता! मला तुमचे वैकुंठपद नको त्यापेक्षा इथे येणार्‍या सर्व भक्तांच्या पायधुळ मला लागेल अशी जागा द्या”. असे म्हणुन संत नामदेवांनी मंदिराच्या पायरीकडे बघितले तर ती भुमी एकदम दुभंगली. या वेळी भगवंत पांडुरंग संत नामदेवास म्हणाले की, ” हे नामा, तुला ही भुमी दिली. माझ्या दर्शनास येणार्‍या भक्तमंडळीची पायधुळ तुला लाभेल.” नंतर पांडुरंगास नामदेवांनी नमस्कार केला आणि त्या दुभंगलेल्या भुमीमध्ये उडी टाकली.त्याचवेळी तिथे असलेल्या संत नामदेवांच्या मंडळींनी उड्या घेतल्या. सर्व लोक बघत असतानाच भुमी एकदम पहिल्याप्रमाणे झाली. ही घटना शके १२३८ आषाढ वद्य त्रयोदशीस झाली. संत नामदेवांसह त्यांच्या परिवारातील ज्या १४ जणांनी उड्या घेतल्या त्यात त्यांची आई गोणाई, वडिल दामाशेटी, पत्नी राजाई, चार पुत्र श्रीनारायण, श्रीविठ्ठल, श्रीगोविंद, श्रीमहादेव तसेच तिघी सुना गोडाई, येसाई, मखराई, मुलगी लिंबाई, बहिण आऊबाई, संत नामदेवांच्या दासी आणि शिष्या संत जनाबाई यांचा समावेश होता. या ठिकाणी पुजेकरीता सर्व लोकांनी पायरी केली आहे या पायरीस संत नामदेव पायरी असे म्हणतात.

Pandharpur
भक्तिरंगाबरोबर लोकरंगाची उधळण

3) लखुबाई मंदिर

दगडी पुलाजवळ दिंडीरवनात हे मंदिर आहे. भगवान श्रीकॄष्ण जेंव्हा द्वारकेहून श्रीरुक्मिणीला शोधण्यास दिंडीरवनात आले तेंव्हा त्यांची आणि रुक्मिणीची भेट या वनात झाली. रुक्मिणी देवीचे तप करण्याचे स्थान हेच लखुबाईचे मंदिर होय.पुर्वी या मंदिराभोवती पुष्कळ झाडी होती. हे मंदिर पुर्णपणे दगडी बांधकाम केलेले असुन हेमाडपंथी पद्धतीचे आहे या मंदिरात दसरा आणि नवरात्र हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

4) विष्णुपाद मंदिर आणि कैकडी महाराज मठ

विष्णुपाद मंदिर आणि कैकडी महाराज मठ हे दोन्ही ठिकाणे पर्यटकांमध्ये चांगलेच ओळखले जातात. विष्णुपाद मंदिर एक सुंदर डिझाइन केलेले असून मठाच्या छताला आधार देणारे १६ खांब आहेत. तेथे भगवान कृष्ण आणि त्यांच्या गायीच्या पायाचे ठसे असलेले एक दगड आहे. कैकाडी महाराज मठ येथे जाण्यासाठी एक विलक्षण स्थान आहे, यात सर्व वेगवेगळ्या महाकाव्य देवता आणि संतांच्या धर्माचे वर्णन करणारे हे एक नवीन नावीन्य आहे.

5) पुंडलिक मंदिर

भक्त पुंडलिकाचे मंदिर चंद्रभागेच्या पात्रात, महाद्वार घाटासमोर आहे. हे मंदिर चांगदेवाने बांधले आहे. मदिरामध्ये मोठा सभामंडप असुन आतिल बाजूस गाभारा आहे. गाभर्‍यातील शिवलिंगावर पुंडलिकाचा पितळी मुखवटा आहे. या मुखवट्यावर टोप घालून नाममुद्रा लावुन पुजा केली जाते. तसेच पहाटेपासुन रात्रीपर्यंत पुंडलिकाचे नित्योपचार,काकड आरती, महापूजा, महानेवैद्य, धुपारती इत्यादी करतात. महाशिवरात्रीला या ठिकाणीमोठा उत्सव असतो. चंद्रभागानदीला पूर आल्यावर पुंडलिकाचा चलमुखवटा उद्धव घाटावरील महादेव मंदिरात ठेऊन तिथे पुजा व नित्योपचार केले जातात.

6) श्रीकृष्ण मंदिर गोपाळपूर

पंढरपुरातील गोपाळपूर या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आहे. या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचे देऊळ आहे. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक जनाबाईच्या देवळातील घुसळखांब घुसळल्याशिवाय जात नाही. चार प्रमुख एकादश्यांना (आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री) आलेले भाविक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी होणारा गोपाळकाला खाण्यासाठी येथे एकत्र जमतात.

Pandharpur
Wari 2022 : हरि रंगात रंगला अभिनेता संदीप पाठक.. करतोय पंढरीची वारी..

7) अहिल्याबाईनी बांधलेला वाडा

राणी अहिल्याबाई यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे आणि नदीघाट बांधले आहे. सोबतच अनेक मंदिराचा जीर्णोद्धार सुध्दा केला आहे. अहिल्याबाई या वारंवार पंढरपूरला भेट देत असतं. त्यावेळी त्यांनी इथे एक वाडा बांधला होता. तो वाडा आजही अहिल्याबाईच्या पुण्याईची साथ देत उभा आहे. हा वाडा जवळपास दोन एकर परिसरात बांधलेला आहे. असं म्हणतात की १३ वर्षे या वाड्याच बांधकाम चालू होतं. तुम्ही पंढरपूरला गेलात नक्की या वाड्याला भेट दया.

8) चंद्रभागा नदी

भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा (भिवरा) इंद्रायणी- भामा- नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णूपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होऊन ही नदी वाहते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील माहात्मेय ‘चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगते. तर, संत जनाबाई ‘भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते.

या सगळ्या ठिकाणी तुम्ही भेट दिली तर तुम्हाला तिथं वेगवेगळ्या रुपातील पांडुरंग आणि पंढरपूर नगरीचं लौकिक समजेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com