निसर्गाने सोपी केली पायवाट; पालखी यवतला विसावली; दर्शनासाठी गर्दी

तुकोबांच्या पालखीचा उद्याचा मुक्काम वरवंडला आहे. लोणी काळभोर येथील श्रीविठ्ठल मंदिराच्या परिसरात सोहळा विसावला होता.
Ashadi Wari 2022 dehu to pandharpur Saint Tukoba palkhi Kirtan yavat
Ashadi Wari 2022 dehu to pandharpur Saint Tukoba palkhi Kirtan yavatsakal

यवत : देहू ते पंढरपूर मार्गावरील लोणी काळभोर ते यवत असा २७ किलोमीटरचा मोठा टप्पा होता. भक्तीरंगात दंग वारकरी ऊन, ढगाळ वातावरण व पावसाचा शिडकावा झेलत सोहळा यवतला विसावला. तुकोबांच्या पालखीचा उद्याचा मुक्काम वरवंडला आहे. लोणी काळभोर येथील श्रीविठ्ठल मंदिराच्या परिसरात सोहळा विसावला होता. मोठा टप्पा पार करायचा असल्याने सोहळ्याला पहाटे जाग आली. पहाटे संत तुकोबांच्या पालखीतील पादुकांना अभिषेक करण्यात आला. आज द्वादशी असल्याने मालक देहूकरांच्या वतीने सकाळी सहा ते आठ अशी कीर्तनसेवा पालखी समोर झाली. कीर्तनानंतर

तुज पाहता सामोरी । दृष्टी ना फिरे माघारी ।।

माझे चित्त तुझ्या पायां । मिठी पडली पंढरीनाथा ।।

असे मंगलमय चरण आळवत सोहळा यवतच्या दिशेने मार्गस्थ झाला. आणि आल्हाददायक वातावरणात निघालेला सोहळ्यावर बोरकर वस्ती, कुंजीरवाडीमार्गे थेऊर फाटा येथे विसावा घेतला. सकाळी ऊन पडल्यानंतर ढगाळ वातावरणात सोहळा विसावे घेत उरुळी कांचन येथे दुपारी पोचला. आजच्या दिवसभराच्या वाटचालीत दोन वर्षांनंतर पादुकांचे दर्शन झाल्याने अनेकांनी कृतार्थता व्यक्त केली.

पावसाचा शिडकावा झेलत पंढरीच्या पंढरीनाथाबद्दलची अपार भक्तीत दंगलेले वारकरी वाटचाल करीत होते. भूपाळी, वासुदेव, जोगी व शनिवारचे असे अभंग म्हणत सोहळा पुढे सरकत होता. परिसरातील काळ्याभोर शेतीतील हिरवेगार ऊस आणि फुलांचे ताटवे वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.

उरुळी कांचननंतर सोहळा सव्वा तीनच्या सुमारास हवेली तालुक्यातून दौंड तालुक्यात आला. यावेळी बोरीभडक येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी संत तुकोबांच्या पालखीतील पादुकांचे दर्शन घेऊन दौंड तालुक्यात स्वागत केले. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला माजी आमदार रंजना कुल यांनी ही दर्शन घेऊन पालखीचे स्वागत केले. त्यानंतरची वाटचाल वेगाने उरकण्यासाठी वारकरी पावले झपझप उचलत होते.

दिंड्यामध्ये हरिपाठ, गुरुपरंपरा, नाटाचे अभंग सुरू होते.

विठ्ठल आमचें जीवन । आगम निगमांचे स्थान ।।

विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यान विसांवा ।।

असे वर्णन संत तुकाराम महाराजांनी केलेले आहे. वारकरीदेखील अशीच भावना मनात घेऊन वाटचाल करीत सोहळा यवतला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास समाज आरतीनंतर विसावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com