रिंगणाने फेडले डोळ्यांचे पारणे

माउलींच्या सोहळ्यात चांदोबाच्या लिंबाजवळ रंगले पहिले उभे रिंगण
Ashadi wari 2022 palkhi reach at taradgaon
Ashadi wari 2022 palkhi reach at taradgaon sakal

तरडगाव : आकाशात फडफडणाऱ्या भगव्या पताका... टाळ-मृदंगाचा गगनभेदी गजर... टिपेला पोचलेला माउलीनामाचा जयघोष... अन् अमाप गर्दीतून अश्वाने केलेली नेत्रदीपक दौड उपस्थित लक्ष-लक्ष नयनांची पारणे फेडणारी ठरली. ऊन-पावसाच्या खेळात सोहळ्यातील रंगलेल्या पहिल्या उभ्या रिंगणानंतर पुंडलिका वरदेचा गजर करीत सोहळा तरडगाव मुक्कामी पोचला. लोणंद तळावर गुरुवारी पहाटे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते माउलींची महापूजा करण्यात आली. सकाळपासून दर्शनासाठी गर्दी होती. बाराच्या दरम्यान जेवणाची लगबग दिंड्यामध्ये होती. अडीच दिवसांचा पाहुणचार घेऊन वारकरी तरडगावच्या दिशेने एक वाजता मार्गस्थ झाले. दुपारच्या वाटचालीत जोरदार पावसाने सोहळ्याला झोडपले.

उन्हामुळे डबडबलेले वारकरी पावसात चिंब भिजले. सोहळ्यातील पहिले रिंगण असल्याने वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. त्यानंतर कडक ऊन पडले. सोहळा सायंकाळी चार वाजता चांदोबाचा लिंब येथे पोचला. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची आधीपासूनच गर्दी होती. रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, उद्धव चोपदार, ज्ञानेश्वर पोंदे यांनी रिंगणासाठी दिंड्यांची ओळी केली. त्यानंतर भोपळे दिंडीतील मानकऱ्याने रिंगणात फेरी मारली. रिंगणात प्रथम स्वाराचा अश्व दौडत पुढून रथाकडे आला. त्यापाठोपाठ माउलींचा अश्व होता. रथाच्या मागे चार दिंड्यापर्यंत अश्व धावले. त्यानंतर फिरून रथाजवळ आले. सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे यांनी अश्वाचे पूजन केले. नारळ प्रसाद दिला. त्यानंतर स्वाराच्या अश्वाशी स्पर्धा करीत माउलींच्या अश्वाने धावत फेरी मारली. या वेळी उपस्थित भाविकांनी माउलीनामाचा जयघोष केला. रिंगणानंतर चांदोबाचा लिंब येथे वारकऱ्यांचे खेळ रंगले होते.

ड्रोनच्या घिरट्या...

माउलींचा सोहळा रिंगणाजवळ येत असताना रथाभोवती सहा ड्रोन उडत होते, त्यातून चित्रीकरण करण्यात येत होते. त्यामुळे वारकरीही त्याच्यात छायाचित्र घेण्यासाठी त्याला हात करून प्रतिसाद देत होते. सोहळा जेव्हा रिंगणाच्या जवळ आला, तेव्हा सर्व रथाच्या बाजूने ड्रोनमधून चित्रीकरण करण्यासाठी गर्दी केली होती.

माउलींच्या सोहळ्यात चालण्याचा आनंद काही निराळाच आहे. विठ्ठल कसा जना-मनात भरलेला आहे, याची प्रचिती येते. वारीत प्रत्येकजण विठ्ठलाच्या ओढीने भान हरपून चालत असतो. वारी ही महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे. ती अखंड चालत राहो, हीच प्रार्थना.

- मनीषा संतोष शिंदे, वाई, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com