हिरव्यागार वनराईतून उत्साही वाटचाल

आल्हाददायक वातावरणात झालेली दुपारपर्यंतची वाटचाल आणि हिरव्यागार वनराईतून हरिनामाचे गोडवे गात माऊलींचा पालखी सोहळा दुपारी वाल्हे मुक्कामी पोचला.
Ashadi wari 2022 sant tukaram maharaj and sant dnyaneshwar mauli maharaj palkhi at walhe
Ashadi wari 2022 sant tukaram maharaj and sant dnyaneshwar mauli maharaj palkhi at walhe sakal

वाल्हे : आल्हाददायक वातावरणात झालेली दुपारपर्यंतची वाटचाल आणि हिरव्यागार वनराईतून हरिनामाचे गोडवे गात माऊलींचा पालखी सोहळा दुपारी वाल्हे मुक्कामी पोचला. वाल्हे तळावरील समाजआरतीचे विश्वरूप दर्शन लाखो भाविकांनी आज नयनात साठवले. सोमवारी भल्या पहाटे माऊलींच्या चलपादुकावर प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. साडेसहा वाजता सोहळा जेजुरीतील मुक्काम उरकून वाल्हेचे दिशेने मार्गस्थ झाला. ढगाच्या छायेत सोहळा वाटचाल करीत असताना मध्ये हलक्याशा पावसाचा शिडकावा वारकऱ्यांच्या पायाला बळ देत होता. दोंडज खिंडीत बघावे तिथे वारकरी विसावा घेताना दिसत होते, तर काही वारकऱ्यांनी टेकडीवर जाऊन हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती.

परिसरातील ग्रामस्थांनी आणलेली न्याहारी घेऊन पालखी सोहळा वाल्ह्याच्या दिशेने सरकला. कमी वाटचाल असल्याने वारकऱ्यांनी दुपारच्या टप्प्यापर्यंतच मुक्कामाचे ठिकाण गाठले. शेताशिवारातून चालताना अभंगांना रंग चढला होता. संपूर्ण वाटचाल वारकऱ्यांनी लिलया पूर्ण केली. पुढे दौंडज ग्रामस्थांनी रांगोळ्यांच्या पायघड्यांनी पालखीचे स्वागत केले. तेथे फुलांचा वर्षाव करण्यात आला. पावणे दोनच्या दरम्यान सोहळा वाल्हे गावात आल्यावर वाल्हेकरांनी बेलफुलांची उधळण आणि माउलीनामाचा गजर करीत स्वागत केले. नंतर सोहळा वाल्हेपासून दोन किलोमीटर अंतरावरील सुकलवाडीत पोचला. सोहळ्यातील एकमेव दुपारच्या समाजआरतीची तयारी सुरू झाली. पालखी तळावर बाळासाहेब चोपदार यांनी गोलाकार रचनेनुसार एकेक दिंड्या क्रमाने सोडल्या. दरम्यान, माउलींची पालखी खांद्यावर घेत तळावर मधोमध ठेवली. यावेळी दिंड्यामध्ये भजन सुरू होते. चोपदारांनी चोप उंचावताच दिंड्यामध्ये शांतता झाली आणि समाजआरतीस सुरुवात झाली. तीनच्या सुमारास माउलींचा पालखी सोहळा मुक्कामी विसावला

वाहनांच्या कोंडीतून वाट काढण्याची वेळ

सासवड-वाल्हे वाटचालीत रस्ता अरुंद असल्याने नेहमीप्रमाणे यंदाही वाहनांची कोंडी झाली. यंदा वारकऱ्यांची आणि वाहनांची संख्या अधिक असल्याने त्यात अधिकच भर पडली. त्यामुळे सकाळी जेजुरीतून निघताना कोंडी झाली होती. नंतर दौंडजनंतर पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे कोंडी सुटण्यास काही प्रमाणात मदत झाली, तरीही दिवसभर वाहनकोंडीतून मार्ग काढूनच वारकऱ्यांना प्रवास करावा लागला.

आज नीरा स्नान...

पुणे जिल्ह्याची वाटचाल संपवून माउलींचा पालखी सोहळा मंगळवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यापूर्वी नीरा नदीवरील दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर सोहळा अडीच दिवसांच्या मुक्कामी लोणंद नगरीत मुक्कामी पोचेल.

वारीत एकरूपता दिसून येते. इतकी सारे माणसे एकोप्याने चालतात, हे वारीचे वैशिष्ट्य आहे. वारी हा सकारात्मकतेचा प्रवाह आहे. इथे कोणी कोणाला वाईट बोलत नाही. इथे प्रत्येक जण माउली या एकाच शब्दावर जगतो. हे वैशिष्ट्य आहे.’’

- जयश्री रोडे, बडोदा, गुजरात

उंडवडीच्या माळरानावर परमानंद

उंडवडी : वरुणराजाने सलग चार दिवस सोहळ्यावर ठेवलेली कृपादृष्टी. रस्ता रुंदीकरणामुळे सुखकर झालेली पायवाट, अभंग आणि आरतीनंतर विविध खेळात रंगलेला सोहळा उंडवडीच्या माळरानावर परमानंदी मनाने विसावला. सोहळा मंगळवारी बारामती शहरात मुक्कामी असेल.

श्री संत तुकोबारायांच्या पादुकांना ग्रामस्थांनी अभिषेक केला. त्यांनतर सोहळा उंडवडीच्या दिशेने मार्गस्थ झाला. सकाळी काकड आरतीचे अभंग गात पाटसला नऊ वाजता पोचला. पाटस-बारामती रस्त्याने निघाला. रोटी गावाच्या अलीकडे असणारा घाट बारा वाजता चढू लागला. पूर्वीचा घाट रस्ता होता. आता रुंदी वाढली आहे. परिणामी, आजची वाटचाल सुखकर झाली. घाट ओलांडून सोहळा रोटी गावाच्या वेशीवर पोचला. यावेळी सोहळ्याचे चोपदार नामदेव गिराम यांनी मालकांच्या सूचनेनुसार अभंग आणि आरतीसाठी सोहळा थांबविला. चोपदार रथावर चोप उंचावला तशी शांतता पसरली. त्यांनी

तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा ।

आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥

नवविधा काय बोलिली जे भक्ती ।

घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ||२||

तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें।

उत्तरेन खरें भवनदी |॥ ३ ॥

हा मानाचा अभंग घेतला. अभंगानंतर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांची आरती झाली. यावेळी गावातील ग्रामस्थांनी नैवेद्य तुकोबारायांच्या आणला होता. त्यानंतर दीडच्या सुमारास सोहळा रोटी गावात दुपारच्या जेवणासाठी पोचला. आजच्या वाटचालीत साडेअकरापासूनच सोहळ्यावर वरुणराजाची कृपादृष्टी होती. यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा आनंद दिसून येत होता. वारकरी फुगड्या उडीचे खेळ खेळत होता. पाटस येथून पालखी काटकोनात वळून बारामतीच्या दिशेला जाते. या रस्त्यावरील काही मोजकीच गाव आहे. त्यांची लोकसंख्यादेखील फार कमी आहे. रोटी घाट चढल्यानंतर उजाड माळरान आहे. येथे पाऊसदेखील कमी असतो. पाण्याची पातळीही कमी असते. परिणामी उद्योग व्यवसाय नाहीत. गावे दुर्गम राहिली. यामुळे या परिसरातील रस्ते अरुंद होते. त्यांची दुरवस्था असायची.

वैराग्याचें भाग्य।

संतसंग हाचि लाग ॥

संतकृपेचे हे दीप ।

करी साधका निष्पाप

अशी स्थिती असताना संत तुकोबांची पालखी आमच्या गावातून जात असल्यामुळे या पालखी सोहळा महामार्ग रुंदीकरणामुळे रस्त्याचे चौपदरीकरण होऊन त्याचा लाभ आम्हाला भविष्यात मिळेल, अशी भावना या परिसरातील ग्रामस्थांची आहे. जिरायत भागाचा असल्यामुळे या परिसरात मोठी गावं आहेत. परिणामी अन्नदान करणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी आहे. दौंड शहरातील गांधी चौकातील शिवशक्ती सेवा मंडळाचे काही पदार्थ काही पदाधिकारी या उंडवडीच्या परिसरात दिंड्यांना अन्नदान करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com