तुकोबांच्या सोहळ्यात रंगले उभे रिंगण

टाळ-मृदंगाचा गजर करीत रिपरिप पावसात नव्याने झालेल्या उड्डाणपुलावर उत्साही उभे रिंगण सोहळा करून तुकोबारायांचा पालखी सोहळा वाखरीत विसावला
Ashadi wari 2022 sant tukaram majaraj palkhi stay at vakhari
Ashadi wari 2022 sant tukaram majaraj palkhi stay at vakharisakal

वाखरी : टाळ-मृदंगाचा गजर करीत रिपरिप पावसात नव्याने झालेल्या उड्डाणपुलावर उत्साही उभे रिंगण सोहळा करून तुकोबारायांचा पालखी सोहळा वाखरीत विसावला. ‘पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ।।’ असे तुकोबांच्या अभंगात वर्णन आहे. राज्यातील घराघरांत पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. दोन वर्षे कोरोनामुळे वारी खंडित झाली होती. त्यापार्श्वभूमीवर होत असलेल्या यंदाच्या वारीला वेगळे महत्त्व आहे. राज्यभर सर्वदूर पाऊस झाल्याने शेवटच्या या टप्प्यावर मागील दोन-तीन दिवसांत सोहळ्यात वारकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजता पिराची कुरोली ग्रामस्थांच्या वतीने पादुकांना अभिषेक करण्यात आला. सात वाजता मालक देहूकरांच्या वतीने कीर्तन झाले.

पालखी रथ आकर्षक सजविण्यात आला होता. माळरानातून बारा वाजता सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. पिराची कुरोलीचे ग्रामस्थ मुख्य रस्त्यापर्यंत निरोप द्यायला आले होते. तेथे देहू संस्थानच्या माजी अध्यक्षा ताराबाई इनामदार यांच्या समाधीजवळ अभंग आरती झाली. सोहळा वाटचाल करीत दीड वाजता भंडीशेगाव हद्दीत पोचला. त्यावेळी अर्धा तास पाऊस बरसत होता. प्लास्टिकचे रंगीबेरंगी कागद अंगावर घेत वाटचाल सुरू होती. दोन तासानंतर सोहळा उभ्या रिंगणासाठी मार्गस्थ झाला. बाजीरावच्या विहिरीजवळ रस्ता होता. कोरोनापूर्वी तेथे दुसरे उभे रिंगण होत होते. परंतु, यंदा त्या ठिकाणी उड्डाणपूल आहे. उड्डाणपुलाच्या सेवा रस्त्याने संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुढे होता.

पाऊस असल्याने सेवा रस्त्याला वारकरी थांबलेले होता. त्यामुळे संत तुकाराम महाराज यांचा सोहळा उड्डाणपुलावरून पुढे गेला. नगारखाना व अश्व त्यामागील दिंड्या व रथ उड्डाणपूल उतरून थांबला. रथामागील दिंड्या उड्डाणपुलावर होत्या. त्यावेळी पावसाची रिमझिम सुरू होती. काका चोपदार व अन्य चोपदारांनी उभे रिंगण लावले. यावेळी संस्थानचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी दोन्ही अश्व रथाच्या दिशेने धावले. रथातील पादुकांचे दर्शन घेऊन रथामागील २२ दिंड्यांपर्यंत पोचला, त्यानंतर नगारखानाजवळ अश्व पोचले. रंगलेल्या रिंगणानंतर पालखी सोहळा वाखरीत मुक्कामी विसावला.

माझ्या घरात अनेक वर्षांची वारी आहे. यंदा मी प्रथमच वारीला आली आहे. कोरोनाकाळात मला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातून बरे झाल्यानंतर वारीला येण्याचे ठरविले. वारीत किती आनंद मिळतो, हे वारीत आल्यानंतरच कळते.

- नंदा रघुनाथ सोडे, अकोला, जि. बुलडाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com