माउलींच्या स्वागतासाठी लोणंदनगरी सज्ज

माउलींच्या स्वागतासाठी लोणंदनगरी सज्ज

लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा उद्या (ता.२४) येथे दीड दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. सोहळ्यातील वारकरी, भाविकांना आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, सुरक्षा आदी विविध सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी लोणंद नगरपंचायतीसह सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, विविध संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळे, व्यावसायिक व नागरिकांनी गेल्या दहा दिवसांपासून अहोरात्र झटून जय्यत तयारी केली आहे. 

माउली पालखी सोहळ्याच्या मुक्कामाचे लोणंद हे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. कोकण, कर्नाटक, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातील मोठ्या संख्येने भाविक येथे वारीत सहभागी होतात. लोणंदनंतर पुढील वाटचालीत वारीत भाविकांची संख्या वाढते हा दरवर्षीचा अनुभव आहे. पुणे जिल्ह्यातून पालखी सोहळा हैबतबाबांच्या जन्मभूमीत प्रविष्ट होत असतो. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एक वेगळेच चैतन्य पसरते. वारकरी व भाविकांची सेवा करण्याची परंपरा जपण्याबरोबर सेवेतून एक आत्मिक आनंद मिळवण्यासाठी सर्वजण पदप्रतिष्ठा बाजूला ठेवून, भान हरपून कार्यरत होतात. लोणंद शहर तर वर्षातून येणारा सण, यात्रा व उत्सवच साजरा करते. येथे अन्नदानाची मोठी परंपरा आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा... या उक्तीप्रमाणे येथील घराघरांत वारकऱ्यांना अन्नदान व जमेल ती सेवा करण्याची परंपरा अद्यापही येथे मोठ्या भक्तिभावाने जपली जाते.

गेल्या दहा दिवसांपासून लोणंद नगरपंचायतीसह सर्व यंत्रणांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. कोल्हापूर परिक्षत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या दोन दिवसांपासून येथील पालखीतळ, नीरा नदीकाठचा दत्तघाट, जिल्ह्याच्या सीमेवरील स्वागत व्यवस्था, चांदोबाचा लिंब आदी ठिकाणी भेटी देवून व्यवस्थेची पाहणी करून काही सूचना केल्या आहेत. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून येथे युध्दपातळीवर कामे करून तयारी केली आहे. नगरपंचायतीने संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवून गावातील मोकळ्या जागेत दिंड्या उतरणाऱ्या ठिकणच्या वेड्या बाभळी व झाडेझुडपे तोडून स्वच्छता केली आहे. सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे व गटारे यांची स्वच्छता केली आहे. जंतुनाशक पावडर व डासांच्या बंदोबस्तासाठी फॉगिंग मशिनद्वारे धूर फवारणी केली जात आहे. गावातील व पाडेगाव येथील जलशुध्दीकरण केंद्रावरील सर्व पाण्याच्या टाक्‍या धुवून, विद्युत मोटारी  व जलवाहिन्यांची दुरुस्ती करून नळपाणी पुरवठ्याची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. शुध्द पाणी पुरवठ्यासाठी टीसीएल व तुरटीचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. पाणीपुरवठा केंद्र व टॅंकर भरण्याच्या सहा ठिकाणी २४ तास कर्मचारी नेमले आहेत. अंतर्गत रस्त्यांची खड्डे बुजवून डागडुजी केली आहे. महिला व पुरुषांच्या दर्शन रांगांचीही व्यवस्था केली आहे. धोबीघाट व अन्य ठिकाणी तात्पुरती नळकोंडाळी उभारून शौचालयांची युनिट बसवण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व अंघोळीच्या पाण्याची सोय केली आहे. बांधकाम विभागाने पालखी तळावर मुरूम, बारीक खडीची कच टाकून रोडरोलरच्या साह्याने सपाटीकरून तळ चकाचक केला आहे. नदी पात्रालगतच्या भिंत रंगवून तळ सुशोभित केला आहे. विविध रस्त्यांचे खड्डे बुजवून व झाडांच्या फांद्या तोडून वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. नीरा नदीवरील दोन्ही पुलांचे कठडे रंगवून सुशोभिकरण केले आहेत. जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीच्या वतीने पाण्याचे टॅंकर भरण्यात येणाऱ्या सर्व ठिकाणी यंत्रणा तैनात ठेवून नीरा नदीवर जिल्ह्याच्या वतीने करण्यात येणाऱ्या स्वागताची तयारी केली आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्या दीपाली साळुंखे, खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापती वंदना धायगुडे-पाटील, गटविकास अधिकारी दीपा बापट व अधिकारी यांनी येथे भेट देवून काल पाहणी केली. खंडाळा तहसीलदार कार्यालयाकडून ठिकठिकाणी रॉकेल वाटपाची व्यवस्था केली आहे. हद्दीमधील सर्व पेट्रोल पंपांवर आवश्‍यक पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार शिवाजीराव तळपे यांनी दिली. नीरा नदीपात्रातही दत्तघाटावर स्नानाच्या ठिकाणी पिंपरे बुद्रुक येथून उजव्या कालव्यातून काही प्रमाणात पाणी सोडले आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून येथे छोटे-मोठे स्टॉलधारक, मिठाईवाले यांनी आपली दुकाने थाटल्यामुळे लोणंदला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

तनिष्का गटातर्फे मोफत औषधांचे वाटप 
सकाळ माध्यम समूहाच्या संभाजीनगर (सातारा) येथील तनिष्क गटाच्या वतीने गटप्रमुख डॉ. पल्लवी साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने लोणंद येथे मालोजीराजे विद्यालयात वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतः डॉ. साठे यांनी दिली.

पाच हजार तुळशीची रोपे वारकऱ्यांना वाटणार
खंडाळा सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्याचे प्रवेशद्वार नीरा नदी, लोणंद येथे तीन हजार, तर फलटण येथे दोन हजार अशी एकूण पाच हजार तुळशीची रोपे पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना वाटण्यात येणार आहेत. तसेच वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्याची सर्व ती तयारी करण्यात आल्याची माहिती खंडाळा सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. 

वारीसाठी...
महसूलतर्फे दोन टॅंकर रॉकेल 
तीन हजार गॅस सिलिंडर उपलब्ध
सहा उंच टॉवरद्वारे प्रकाश व्यवस्था
तळावर ध्वनिक्षेपकासह २४ तास मदत केंद्र
नीरा उजव्या व डाव्या कालव्याला पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com