वारकऱ्यांसाठी २४ तास आरोग्य सेवा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 June 2017

लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा व सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. 

लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा व सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. 

श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे लोणंद येथे शनिवारी (ता. २४) दीड दिवसांच्या मुक्कामासाठी अगमन होत आहे. या काळात सोहळ्यातील वारकरी व भाविकांना सर्व प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने व खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही तयारी सुरू आहे. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय गोखले यांनी याबाबत माहिती दिली. वारकरी व भाविकांना शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी पालखी मार्गावरील १८ विहिरींच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत. टी. सी. एल. चीही तपासणी करण्यात आली आहे. पाणी शुद्धीकरणासाठी १७ कर्मचाऱ्यांच्या पाच पथकांची नियुक्ती केली आहे. जलशुद्धीकरणासाठी टी. सी. एल. व मेडिक्‍लोअरचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध करण्यात आला आहे. पाडेगाव व लोणंद येथे दहा ठिकाणी पाण्याचे टॅंकर भरून देण्याची व्यवस्था केली आहे. त्याच्या नियंत्रणासाठी २९ कर्मचाऱ्यांची नऊ पथके तैनात ठेवलीत.

भाविकांना २४ तास आरोग्य सेवा पुरवण्यासाठी तीन वैद्यकीय पथकांमध्ये १३ वैद्यकीय अधिकारी, नऊ औषध निर्माण अधिकारी, २७ आरोग्य सेविका व नऊ शिपाई कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारच्या औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवला आहे. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील तपासणी प्रयोगशाळा २४ तास कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे.  पालखी तळावर एक, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन, माउलींचे नीरा नदी स्नान येथे एक अशा एकूण चार रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. पालखी मार्गावरील व लोणंद शहरातील सर्व हॉटेल्स, फळ विक्रेते, चहा टपरीधारकांच्या पाणी व अन्न तपासणीसाठी स्वतंत्र आरोग्य पथक नेमून तपासणी करण्यात येत आहे. आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यास टोल फ्री क्रमांक- १०८ व १०२ किंवा ०२१६९- २२५३७३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ. गोखले यांनी केले आहे.

फिरते मोटारसायकल आरोग्य दूत
पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी व भाविकांना तातडीने आरोग्यसेवा मिळावी, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या संकल्पनेतून या वर्षी २० फिरते मोटारसायकल आरोग्य दूत कार्यरत राहणार आहेत. हे आरोग्यदूतांना केसरी ड्रेस कोड देण्यात आला असून प्राथमिक उपचार कीट (फस्टेड बॉक्‍स) देण्यात येणार आहे. हे आरोग्य दूत वारकऱ्यांना तातडीची आरोग्य सेवा देण्याबरोबर आरोग्यविषयक जागृतीही करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Palkhi 2017 lonand news palkhi