esakal | अभंगवाणीचा महिमा अगाध
sakal

बोलून बातमी शोधा

अभंगवाणीचा महिमा अगाध

अभंगवाणीचा महिमा अगाध

sakal_logo
By
नीला शर्मा

पंढरपूरच्या आषाढवारीत सामील होणाऱ्या वारकऱ्यांच्या मुखी संतांची अभंगवाणी घोळत असते. ती त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करते. परस्परांना समन्वित करते. मनातील विकार दूर ठेवायला मदत करते. या अभंग, पद, गवळण, भारुड आदी संतकाव्यांचा महिमा अगाध आहे. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी तो उलगडून दाखवला आहे.

डॉ. देखणे म्हणाले, ‘‘पंढरीचा विठोबा हे एक लोकदैवत आहे. सकल संतांनी त्याला आपलं श्रद्धास्थान मानलं आहे. नाना प्रकारच्या धर्म, पंथ, संप्रदाय अथवा जातिभेदांच्या चौकटी बाजूस सारून अद्वैतवाचक भूमिकेतून विठ्ठलाकडे पहिलं जातं. संतांच्या अभंगवाणीतील शब्दवैभवानं मराठी सारस्वतात आगळंवेगळं स्थान मिळवलं आहे. पांडुरंगाची मूर्ती ही दर्शनरूपानं योगमूर्ती, तत्त्वदर्शनानं ज्ञानमूर्ती व भावदर्शनानं भगवतमूर्ती आहे. तिचं सुंदर स्वरूप वर्णन करण्यासाठी संतांचे शब्द पुढं सरसावतात. त्यातून परब्रह्माचं रूप समोर प्रकटताच संत व भक्त तात्त्विक पातळीवर अद्वैतात जातात, पण भावनिक पातळीवर द्वैतातच असतात. ब्रह्मभावात गेलेले संत पुन्हा स्वरूप स्थितीत येऊन वर्णन करू लागतात, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी.’’

ज्ञानेश्‍वरांपासून निळोबारायांपर्यंत अनेक संतांनी आपल्या आत्मानुभूतीच्या अभिव्यक्तीसाठी अभंगांचं माध्यम वापरलं आहे. अभंग हे वारकऱ्यांचे वेद व उपनिषदं आहेत. ‘वाचे बोलू वेदनीति,’ असं तुकोबा म्हणतात. अभंगांमधून वेदांचां सारांश लोकरूपात मांडला आहे. अभंग म्हणजे मराठी संतांच्या पारमार्थिक आत्मचरित्राचा सागर आहेत. वारकऱ्यांमध्ये प्रत्येक दिंडीनुसार अभंगांचा विशिष्ट क्रम ठरलेला असतो. हैबतबाबा ज्ञानेश्‍वरांसमोर बसले आणि खांद्यावर वीणा घेऊन ज्या क्रमानं त्यांनी अभंग म्हटले, त्यात आधी मंगलाचरण होतं. ते तसंच ठेवून सांप्रदायिक फडांप्रमाणे क्रम वेगळा असतो. साधारणपणे मंगलचरणाचे तीन-चार अभंग, मग काकड आरती, नंतर भूपाळ्या, विनंतीचे अभंग तसंच वासुदेव, जोगी, बाळसंतोष, बहुरूपी आदी रूपकात्मक अभंग असतात. त्यानंतर हरिपाठ, नाटाचे अभंग असा बराच मोठा विस्तार असतो, असंही देखणे यांनी सांगितलं.

भजनाच्या उत्तरार्धात गवळण गाण्याची परंपरा आहे. आध्यात्मिक अर्थाचं हे रूपकात्मक शृंगारकाव्य असतं. भारुडांमध्ये वेगवेगळी रूपकं वापरून संतांनी समाजप्रबोधन केलं. अभंगांच्या या लोकवाणीतून लोकभावनांचा पूर वाहतो. मानवी पाच भावरंगांच्या पाच गवळणी शेवटी विठ्ठलचरणी एकरूप होतात तेव्हा अवघा रंग एक होतो.