पहाटेचे शिंग वाजताच पालखी होते मार्गस्थ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 July 2017

पहाटेचे शिंग (तुतारी) वाजताच वारकरी उठतात... सकाळी पुन्हा ६.४५ वाजता पाच-पाच मिनिटांच्या अंतराने तीन शिंग वाजतात अन्‌ पालखी मार्गस्थ होते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हे शिंग वाजवण्याचे काम सुमारे ६५ वर्षांचे पोपट तांबे हे चोखपणे करतात.

पहाटेचे शिंग (तुतारी) वाजताच वारकरी उठतात... सकाळी पुन्हा ६.४५ वाजता पाच-पाच मिनिटांच्या अंतराने तीन शिंग वाजतात अन्‌ पालखी मार्गस्थ होते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हे शिंग वाजवण्याचे काम सुमारे ६५ वर्षांचे पोपट तांबे हे चोखपणे करतात.

पालखीतील वारकऱ्यांना शिस्त आहे. त्यांच्यावर चोपदारांचे नियंत्रण असते. या शिस्तपणात तुतारीवाल्याचाही महत्त्वाचा वाटा आहे. तुतारी वाजवण्याच्याही वेळा अन्‌ नियम आहेत. त्या वेळेतच पालखीत तुतारी वाजवली जाते. १८ वर्षांपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील वाळुंज येथील तांबे हे तुतारी वाजवत आहेत. ते म्हणतात, पालखीप्रमुख आणि चोपदारांच्या आदेशाप्रमाणे वारकऱ्यांना तुतारीच्या माध्यमातून इशारा दिला जातो. जोपर्यंत तुतारी वाजत नाही तोपर्यंत वारकरी जागा सोडत नाहीत. पहाटे काकडा आरतीसाठी एकदा तुतारी वाजवली जाते. त्यानंतर पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पालखी मार्गस्थ करण्यासाठी तयारी केली जाते. ६.४५ वाजता पहिले शिंग वाजवले जाते. त्यानंतर पालखीच्या बैलांची तयारी केली जाते. ६.५० वाजता दुसरे शिंग वाजवले जाते तेव्हा बैलं पालखीला झुंपली जातात. त्यानंतर बरोबर सात वाजता तिसरे शिंग वाजवले जाते. त्यानंतर पालखी मार्गस्थ होते. दुपारी पालखीच्या ठिकाणी वारकऱ्यांना इशारा देण्यासाठी शिंग वाजवले जाते.  विसाव्याच्या ठिकाणी आल्यानंतर व तेथून पुढे मार्गस्थ होण्यासाठी शिंग वाजवले जाते. सायंकाळी समाज आरती व इतर पारंपरिक विधी व कार्यक्रमासाठी तुतारी वाजवली जात असल्याचे तांबे यांनी सांगितले.

‘सरकारकडून दुर्लक्ष...’
तुतारी वाजवणे ही एक पारंपरिक कला आहे. ती टिकली पाहिजे. आता नव्या पिढीत तुतारी वाजवणाऱ्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. ही कला टिकवायची असेल तरी अशा कलाकारांना योग्य मानधन देण्याची आवश्‍यकता आहे. परंतु सरकार दुर्लक्ष करत आहे. मला सध्या अतिशय तुटपुंजे मानधन मिळत असल्याचे तांबे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pandharpur-wari-2017