वारीबंदीचा निर्णय वारकऱ्यांच्या जिव्हारी : बंडातात्या कऱ्हाडकर

सकाळ वृत्तसेवा | Tuesday, 23 June 2020

काेराेना सारखा प्रसंग पुन्हा कधीही येऊ नये ही प्रार्थना पंढरीनाथाला करणे एवढेच आपल्या हाती असल्याचे या वेळी हभप बंडातात्या कऱ्हाडकर यांनी स्पष्ट केले.

फलटण शहर (जि.सातारा) : सुमारे 188 वर्षांपूर्वी 100 ते 200 लोकांच्या सहभागाने सुरू झालेला माउलींचा पालखी सोहळा आज तीन लाखांहून अधिक लोकांच्या सहभागाचा झाला आहे. एवढा मोठा समाज एकत्र येऊन गुण्यागोविंदाने चालतो. त्याचे दररोजचे व्यवस्थापन आखीव- रेखीव असते. त्याचे देशातीलच नव्हे जगभरातील लोकांना कुतूहल वाटते; परंतु वारीबंदीचा निर्णय शासनाने घेतला. तो आमच्या जिव्हारी लागला असून, यंदा हा सोहळा रद्द होण्याची बाब वेदनादायी आहे, असे मत हभप बंडातात्या कऱ्हाडकर यांनी व्यक्‍त केले.
 
बंडातात्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंप्रद (ता. फलटण) येथे संत ज्ञानेश्वर गोपालन व संशोधन संस्था, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रचे मध्यवर्ती कार्यालय आणि हभप भगवानमामा कऱ्हाडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित विद्यालय (निवासी) गुरुकुल धर्तीवरील शाळा चालविण्यात येत आहे. तेथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
 
सोहळा नाही ही कल्पनाच मनाला मोठी वेदना देणारी असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, की संपूर्ण जगाला वेड लावणारी पंढरीची ही वारी महाराष्ट्रीय संस्कृतीचा मानबिंदू मानावी लागेल. आषाढी एकादशी आणि वारी याचे वेध वारकऱ्यांना दोन महिन्यांपासून लागतात. सामूहिक उपासनेची सुलभता या वारीत जाणवते. देदीप्यमान असणारा हा सोहळा यावर्षी बंद राहिला हे वारकरी संप्रदायावरील अभूतपूर्व संकट असल्याचे नमूद करीत "घरी खाणे पिणेसी असो नसो, प्रपंच होवो न होवो' वारीच्या ओढीने ज्येष्ठ वद्य अष्टमीस नियमितपणे येणारा वारकरी यंदा कोरोनाच्या आपत्तीत सापडला आणि "नको नको हा वियोग, कष्ट होताती जीवाशी' अशा विरहात पडला आहे. वास्तविक काही झाले तरी वारी न चुकू दे हरी या अपेक्षेचा वारकरी वारी चुकल्याचे दुःख भोगतो आहे, असेही बंडातात्यांनी स्पष्ट केले. शासनाने घेतलेला वारी बंदीचा कठोर निर्णय आमचे जिव्हारी लागला. तथापि या आजाराचे उत्तरोत्तर वाढते स्वरूप पाहता त्याला पर्याय नसल्याचे सुज्ञ वारकरी जाणतात. असा प्रसंग पुन्हा कधीही येऊ नये ही प्रार्थना पंढरीनाथाला करणे एवढेच आपल्या हाती असल्याचे या वेळी हभप बंडातात्या कऱ्हाडकर यांनी स्पष्ट केले. 

सरकारचा निर्णय आगतिकतेने नव्हे : बंडातात्या कऱ्हाडकर

गावीच साजरी करू वारी... 

संपूर्ण वारकरी समाजावर हा दुःखद प्रसंग आला आहे; परंतु समाजहित ध्यानी घेऊन आपल्या श्रद्धेला मुरड घालणे आपले नैतिक कर्तव्य आहे. आपापल्या गावीच राहून पंढरीतला राजा आपल्यासाठी धावून आला आहे, या दृढ श्रद्धेने अंत:करणावर दगड ठेवून आपण यावर्षी वारी गावीच साजरी करू. शासनाचे या निर्णयास सहकार्य करू, असे आवाहनही बंडातात्या कऱ्हाडकर यांनी केले आहे.