रिंगण सोहळ्याने अवघा झालासे आनंद 

(शब्दांकन - सचिन शिंदे)
Wednesday, 28 June 2017

सोहळ्यात आज 
पालखी सोहळा इंदापुरातून मार्गस्थ होणार
गोकुळीचा ओढा-विठ्ठलवाडी येथे पहिला विसावा 
वडापुरी व सुरवड येथे दुपारचा विसावा
बावड्यात चौथा विसावा घेऊन पालखी सराटी येथे विसावणार

शरद अवघड, वाकुर्णे (ता. बदनापूर, जि. जालना)
रिंगणात धावताना ‘भाग गेला, शीण गेला, अवघा झालासे आनंद...’ अशी भावना माझ्या मनात निर्माण होते. चालून चालून दमलेल्या पायांना एक प्रकारचा आराम मिळतो. बारा वर्षे मी वारी करतोय. प्रत्येक वेळी वारीत विठुरायाचे दर्शनाएवढेच सोहळ्यातील रिंगणाचे आकर्षण असते. प्रत्येक वारकरी तितक्‍याच आनंदाने त्यात सहभागी होत असतो. मी रथामागील ११२ क्रमांकाच्या भानुदास बाबा आटळकर प्रासादिक दिंडीत चालतो. दिंडीच्या झेंड्याची जबाबदारी माझ्याकडे असते. ती अनेक वर्षांपासून पार पाडतो आहे.    

संत तुकोबारायांचा पालखी सोहळा मंगळवारी निमगाव केतकीतून सकाळीच मार्गस्थ झाला. पंधरा किलोमीटरवरचा प्रवास होता. पहिल्या विसाव्यानंतर इंदापूरनगरीत पालखी सोहळा दाखल झाला. तेथील जंगी स्वागताने आनंद झाला. तेथील कदम विद्यालयाच्या मैदानावर सोहळ्यातील दुसरा गोल रिंगण सोहळा होणार होता. आमचीही दिंडी येथे दाखल झाली. इंदापुरात सोहळा अत्यंत देखणा होतो. बारा वर्षांपासून त्याचा आनंद घेतो आहे. त्यात बहुतांशी वेळा झेंडेकरी म्हणूनच मी धावलो आहे. आजही तो आनंद घेणार असल्याने मन प्रसन्न होते. रिंगणात जय्यत तयारी होती. कमानी उभारल्या होत्या. शाळेच्या प्रांगणात मोठ्या रांगोळ्या रेखाटल्या होत्या. मधोमध पालखी ठेवण्यासाठी आकर्षक मंडप उभारला होता. पोलिस बंदोबस्त होता. अनेक महत्त्वाच्या लोकांची उपस्थिती होती. रिंगणात पोचलो, त्या वेळी गर्दी बऱ्यापैकी होती. पालखी रिंगणात पोचली. पालखीची प्रदक्षिणा सुरू होती. त्या वेळी झेंडेकरी, तुळस घेतलेल्या महिला, पखवाजवादकांसह टाळकऱ्यांना आतील रिंगणात बसवण्यात आले. आता वेध लागले होते कधी रिंगण सोहळा होणार याचे. त्यानंतर अश्वाला रिंगण मार्ग दाखवण्यात आला.

त्यानंतर माईकवरून पालखी सोहळा प्रमुखांनी नियोजन सांगितले. झेंडेकऱ्यांनी धावण्याचा पहिला मान देण्यात आला. मी सगळ्यांत पुढेच होतो. इशारा झाला आणि आम्ही धावत सुटलो. विठुरायाच्या नामाचा गजर चालूच असल्याने वेगात धावूनही त्याचा त्रास झाला नाही. ‘अवघा झालासे आनंद’ अशीच भावना त्या वेळी मनात आली. त्यानंतर टाळकरी, तुळस घेतलेल्या महिला व पखवाज वादक धावले. मूळ रिंगण सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी रिंगणाच्या कडेला जाऊन बसलो. रिंगण सोहळा लावण्यात आला. ‘पुंडलिका वरदे...’चा गजर झाला अन्‌ अश्व वाऱ्याच्या वेगाने रिंगणातून धावले. त्याच्या मागे मानाचे अश्वही धावले. तीन वेळा धावलेले अश्व डोळ्यांत साठवण्याचा आनंद मिळाला. तो प्रत्येक वर्षी घेत असतोच. प्रत्येक वर्षी तो वेगळीच अनुभती देऊन जातो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Maharaj Palkhi 2017