तुकोबांच्या नीरा स्नानाचा यंदाही प्रश्न

तुकोबांच्या नीरा स्नानाचा यंदाही प्रश्न

सराटी येथील बंधाऱ्यात पुरशे पाणी नाही, 29 जूनला होणार स्नान

माळीनगर, ता. 22 : सराटी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीवरील बंधाऱ्यात पुरेसे स्वच्छ पाणी नसल्याने सलग तिसऱ्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या नीरा स्नानाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संत तुकोबांचा पालखी सोहळा 28 जूनला सराटी येथे मुक्कामी येत आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा अकलूजकडे मार्गस्थ होतो. तत्पूर्वी सकाळी सराटी येथे नीरा नदीत तुकोबांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्याची परंपरा आहे. त्यानुसार यंदा 29 जूनला नीरा स्नान होणार आहे. मागील दोन वर्षापासून सराटी येथील बंधाऱ्यात पालखी सोहळ्यावेळी पाणी नसल्याने नीरा स्नानाचा प्रश्न निर्माण होत आहे. गतवर्षी वीर, भाटघर, देवधर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलै, ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस झाल्याने हि धरणे भरून वाहिली होती. त्यामुळे नीरा नदीला अनेक वर्षानंतर पूर आला होता. नीरा नदी दुथडी भरून वाहिली होती. पूर येऊन गेल्यावर काही महिने नीरा नदीत पाणी खळखळत होते. या नदीवरील सर्वच बंधारे भरल्याचे चित्र दिसत होते.

मात्र, यंदाचा उन्हाळा अतिशय कडक होता. नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके वाचविण्याची धडपड होती. त्यामुळे फेब्रुवारी, मार्चपासूनच बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट होऊ लागली होती. मे महिन्यात तर बंधारे कोरडे ठणठणीत पडले होते. त्यात सराटीचा बंधारा अपवाद नव्हता. त्यातील पाणीही संपले होते. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसाने सराटीच्या बंधाऱ्यात सध्या पाणी साठल्याचे दिसत आहे. मात्र, ते पाणी वाहत नाही. अशातच बंधाऱ्याच्या पश्‍चिमेकडील भागात साचलेल्या पाण्यात म्हशी डुंबतानाचे चित्र पहावयास मिळाले.

निरा खोऱ्यातील धरणात अल्प पाणीसाठी
वीर, भाटघर, देवधर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा अजून पाऊस झाला नाही. त्यामुळे या धरणांची पाणीपातळी नीचांकी आहे. वीर धरणामध्ये सात टक्के तर भाटघर व देवधर धरणांत प्रत्येकी केवळ एक टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पावसानेही दडी मारली आहे. त्यामुळे आठवडाभरात हि धरणे भरून नीरा नदीला पाणी येईल, याची अजिबात शाश्वती नाही. त्यामुळे सराटी येथील बंधाऱ्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यात तुकोबांच्या पादुकांचे नीरा स्नान होणार कि प्रशासन त्यावर अन्य मार्ग काढणार, हा प्रश्न आहे.

पालखी सोहळ्याच्या वाटचालीत पाण्याची अडचण सगळीकडे आहे, हे जाणवत आहे. पाऊस नाही हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे अट्टाहास धरण्यात अर्थ नाही. प्रशासनाकडून पाण्याचा एक टॅंकर घेऊन त्याद्वारे तुकोबांच्या पादुकांना सराटी येथे नीरा स्नान घालू.
- अभिजित महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख

सराटीच्या बंधाऱ्यातील पाणी खराब असल्यास तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या नीरा स्नानासाठी दोन टॅंकरची व्यवस्था केली जाईल.
- संजीव जाधव, प्रांताधिकारी, अकलूज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com