Wari 2019 : देहू, आळंदीसाठी एसटीच्या जादा गाड्या

सकाळ वृत्तसेवा | Wednesday, 19 June 2019

राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) आषाढी वारीनिमित्त शनिवारपासून (ता. २२) देहू, आळंदी, सासवडसाठी जवळपास १६ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यातील १० गाड्या वल्लभनगर आगारातून सुटणार आहेत. याखेरीज भाविकांच्या गर्दीनुसार जादा गाड्यांचे नियोजन केले जाणार आहे.

पुणे - राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) आषाढी वारीनिमित्त शनिवारपासून (ता. २२) देहू, आळंदी, सासवडसाठी जवळपास १६ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यातील १० गाड्या वल्लभनगर आगारातून सुटणार आहेत. याखेरीज भाविकांच्या गर्दीनुसार जादा गाड्यांचे नियोजन केले जाणार आहे. 

एसटी महामंडळातर्फे दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडल्या जातात. पुढील आठवड्यापासून आषाढीवारीला सुरवात होत आहे. त्यामुळे महामंडळातर्फे जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत वल्लभनगर एसटी स्थानकाचे वाहतूक निरीक्षक हेमंत खामकर म्हणाले, ‘‘शनिवारी २२ ते २४ पर्यंत स्वारगेट-आळंदी अशा चार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, तर २५ जूनला वल्लभनगर येथून देहू-आळंदीसाठी चार जादा गाड्या सोडल्या जातील.

२६ व २७ जूनला आळंदी-पुणे अशा दोन जादा गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. तर २८ व २९ तारखेला वल्लभनगर येथून पुणे-सासवड अशा ६ गाड्या सुटतील.’’ शिवाजीनगर स्थानकावर मराठवाड्यातील भाविकांची तर पश्‍चिम महाराष्ट्रातील भाविकांची मुख्यत्वे स्वारगेट येथे गर्दी होते. त्यामुळे भाविकांची गर्दी पाहून तेथे आवश्‍यकतेनुसार जादा गाड्या पाठविण्याची व्यवस्था केली जाईल. पंढरपूर येथील जादा गाड्यांच्या नियोजनाचे आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचे खामकर यांनी स्पष्ट केले.