Wari 2019 : मंदिर परिसरात सीसीटीव्ही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी (ता.२४) व संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (ता. २५) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. सध्या देवस्थान, नगरपालिका प्रशासन, पोलिस अशा सर्वच पातळ्यांवर तयारीला वेग आला आहे. या तयारीचा आढावा घेणारी वृत्तमालिका...

देहू - आषाढी वारीसाठी जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता. २४) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्‍वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मुख्य देऊळवाड्याबाहेरील परिसरात, तसेच सोहळ्यातील चांदीच्या रथालाही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. देऊळवाड्यात वारकऱ्यांना शुद्ध आणि थंड पाणी पिण्यास मिळावे, यासाठी चार कुलर बसविले आहेत.

याबाबत पालखी सोहळाप्रमुख संजय महाराज मोरे यांनी सांगितले, की चांदीच्या रथाचे काम खडकी येथील फॅक्‍टरीत पूर्ण झाले आहे. यंदा रथावरील जनरेटरची जागा बदलण्यात आली असून तो रथाच्या खाली बसविला आहे.

भाविकांना पालखीमार्गावर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन व्यवस्थित व्हावे, यासाठी खास सोय करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने रथावर चार कॅमेरे बसविले आहेत. देऊळवाड्यातील स्वच्छतेसाठी ३५ कर्मचारी नेमण्यात आले असून सहा सुरक्षारक्षकही तैनात केले आहेत.

महाद्वारातून पालखी प्रस्थानाच्या दिवशी दिंड्यांना प्रवेश देण्यात येणार असून तपोनिधी नारायण महाराज प्रवेशद्वारातून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. वैकुंठस्थानी चार कॅमेरे बसविले आहेत. मंदिराला फुलांची सजावट करण्यात येणार आहे. 

पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने गाथा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली असून, विद्युत रोषणाई केली आहे. या वेळी संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख काशिनाथ मोरे, अजित मोरे, विश्‍वस्त माणिक महाराज मोरे, विशाल मोरे, संतोष महाराज मोरे उपस्थित होते.

३२१ दिंड्यांचा सहभाग
यंदा पालखी सोहळ्यात ३२१ दिंड्या या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. भाविकांना विविध सोयी उपलब्ध करण्याबाबत पाणी, आरोग्य, वीज, रस्ते विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्याचप्रमाणे पालखी मार्गावर निवाऱ्यासाठी तंबू तसेच अन्नदानासाठी लागणारे साहित्य खरेदी केले आहे. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजेच्या साहित्याची खरेदी केली आहे. मानकरी सेवेकरी, दिंडीप्रमुखांना पत्रव्यवहार केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 sant Tukaram maharaj Palkhi Sohala Rath Temple CCTV