esakal | देहू-निगडी पालखी मार्गावर रस्त्याची दुरवस्था 
sakal

बोलून बातमी शोधा

देहू-निगडी पालखी मार्गावर रस्त्याची दुरवस्था 

देहू-निगडी पालखी मार्गावर रस्त्याची दुरवस्था 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देहूरोड - संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर देहू ते निगडीदरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. साइडपट्ट्या खचल्या असून, पदपथावर झाडांच्या फांद्या वाढल्या आहेत. चौपदरीकरणासाठी खोदाई केली आहे. सोहळा आठ दिवसांवर आल्याने रस्ते विकास महामंडळ, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड आणि देहू ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या या सुमारे सात किलोमीटर मार्गावर दुरुस्ती व अन्य उपयोजना युद्धपातळीवर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

निगडी-प्राधिकरण ते देहू फाटा पालखी मार्गावर प्राधिकरण कार्यालयासमोर पदपथावर पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. निगडी ते देहूरोडदरम्यान चौपदरीकरणात दोन्ही बाजूला खोदाई केली असून, रस्ताही उखडला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने लावलेले असंख्य बॅरिकेड्‌स पालखी काळात अडथळा ठरणार आहेत. 

इनामदारवाडा ते देहूरोड येथील संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार मार्गावर देहूतील बाजारआळीत वाहने पदपथावर उभी केली जातात. ग्रामपंचायतीजवळही मोठ्या वाहनांनी रस्ता व्यापला आहे. प्रवेशद्वारालगत चेंबर फुटले आहेत. पालखीची पहिली अभंगआरती होणाऱ्या अनगडशाहवली बाबा दर्ग्यालगत रस्ता उखडला आहे. माळवाडीत सरकारी खोदाई कामातील राडारोडा रस्त्यावर पडला आहे. 

सीओडीडेपो ते माळवाडी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सीओडीसमोर झाडाच्या फांद्या पदपथावर वाढल्या आहेत. पुढे खचलेल्या रेल्वे पटरीत भर टाकण्याची गरज आहे. शनी मंदिराजवळ खचलेली साइडपट्टी धोकादायक असून, भराव टाकण्याची मागणी बाळासाहेब जाधव यांनी केली. 

कार्यवाही करणार - वैष्णव 
कॅंटोन्मेंट हद्दीतील खड्डे, साइडपट्टी भरणार असल्याचे स्टेशन कमांडर व कॅंटोन्मेंट अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांनी सांगितले. 


दरम्यान, चौपदरीकरणाच्या ठिकाणी पालखी काळात करावयाच्या सुरक्षा उपायांचा आराखडा तयार केल्याचे रस्ते विकास महामंडळ अंतर्गत काम करणाऱ्या पीबीए इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि.चे संचालक रणजित काकडे यांनी सांगितले. ग्रामपंचायत हद्दीत खडीकरण सुरू असल्याचे सरपंच सुनीता टिळेकर म्हणाल्या.