सातारा शहरानजीकच्या रामनगर परिसरात आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास एका फर्निचरच्या गोदामास भीषण आग लागली.
या आगीची माहिती कळताच सातारा पालिकेचे फायर ब्रिगेडचे पथक पाण्याच्या टॅंकरसह घटनास्थळी पोहचले. या पथकानं आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
दरम्यान, या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
रामनगर येथील अंबिका फर्निचरच्या गोडाऊनला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेची माहिती कळताच परिसरातील युवकांनी गोडाऊनच्या दिशेनं धाव घेतली.
काहींनी फायर ब्रिगेडला, तर काहींनी पोलिसांना फोन केले. घटनास्थळी जमलेल्या युवकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, आगीनं रौद्र रुप धारण केलं होतं.
दरम्यान, फायर ब्रिगेडच्या दोन ते तीन गाड्या मागवण्यात आल्या. या पथकानं आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले.
ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास तालुका पोलीस करीत आहेत. (फोटो - प्रमोद इंगळे)