सातारा : गुरुवार बागेच्या परिसरातील तख्ताचा वाडा येथे बांधकामासाठी खुदाई करत असताना ऐतिहासिक रांजण आढळला.
यामुळे याठिकाणचे काम पालिकेने थांबविण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्या. या जागेत होणाऱ्या बांधकामास नागरिकांनी देखील विरोध दर्शवला होता.
गुरुवार बागेत तख्ताचा वाडा असून, त्याला इतिहासकालीन महत्त्व आहे. याठिकाणी एक बांधकाम नियोजित करण्यात आले होते. यासाठीची खुदाई त्याठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.
या कामास त्याठिकाणचे रहिवासी, तसेच माजी उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के आणि अरबाज शेख यांनी विरोध दर्शवला होता. याच अनुषंगाने अरबाज शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास देखील निवेदन दिले होते.
या बागेच्या परिसरात तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराज यांनी दत्ताच्या वाड्याचे बांधकाम केले होते.
या जागेत होणाऱ्या बांधकामास होणारा विरोध वाढत असतानाच खुदाईदरम्यान त्याठिकाणी पुरातन रांजण सापडला. याची माहिती नंतरच्या काळात खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यात आली.
पाहणीअंती समाजमंदिराचे काम थांबविण्याच्या सूचना उदयनराजे यांनी पालिकेस केल्या. (प्रमोद इंगळे : छायाचित्रसेवा)