रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कऱ्हाड ते मंत्रालय ‘वारी शेतकऱ्यांची’ ही पदयात्रा सहकारमंत्री अतुल सावे व प्रवीण दरेकर यांच्या आश्वासनानंतर साताऱ्यातून स्थगित करण्यात आली.
येत्या 15 दिवसांच्या आत मंत्रालयात बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात आलं.
दरम्यान, पदयात्रा साताऱ्यात येताना खोत यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवराज पंपाजवळ महामार्गावर ठिय्या मारला. त्यामुळं पोलिसांची तारांबळ उडाली.
सरकारला जागं करण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी कऱ्हाड येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून पदयात्रा काढली होती.
काल या यात्रेचं साताऱ्यात आगमन झालं. खिंडवाडीतून यात्रा महामार्गाच्या कडेनं शिवराज पेट्रोल पंपाजवळ आली. या वेळी सदाभाऊंसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाचे आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे कारण देत महामार्गावर ठिय्या मारला.
त्यामुळं पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिस अधिकाऱ्याने सदाभाऊंपुढे हात जोडले. त्यानंतर पदयात्रा पुढे मार्गस्थ झाली.
बॉम्बे चौकातून यात्रा पोवई नाक्यावर आली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.