प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या स्कॅम १९९२ या मालिकेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.
हर्षद मेहतानं शेयर मार्केटमध्ये जो मोठा आर्थिक घोटाळा करुन ठेवला होता त्याचे प्रभावी चित्रण मेहता यांनी त्यांच्या स्कॅम नावाच्या मालिकेमध्ये केले होते. आता त्यांची स्कूप नावाची सहा भागांची एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
प्रसिद्ध पत्रकार जिग्ना वोरा यांच्या Behind Bars in Byculla: My Days in Prison नावाच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकावर आधारित या मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ही मालिका प्रदर्शित होऊ नये यासाठी कुख्यात छोटा राजनच्या वतीनं हायकोर्टामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली होती.
वेगवेगळ्या गोष्टींची पोलखोल करणारी ही मालिका वोरा यांच्या अथक संघर्ष आणि वेदनामय आयुष्यावरही बोट ठेवते.
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेनं सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. स्कूप या मालिकेमध्ये पत्रकार जे डे यांची हत्या प्रकरणी छोटा राजन यांच्यासह पत्रकार वोरा यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते.
जिग्ना वोरा या मुंबईतील प्रसिद्ध पत्रकार होत्या. त्यांना २०११ मध्ये जे डे नावाच्या पत्रकाराच्या हत्येत सहभाग म्हणून अटक देखील करण्यात आली होती.
वोरा यांनी क्राईम रिपोर्टर म्हणून एशियन एज नावाच्या इंग्रजी दैनिकामध्ये काम करत होत्या. त्यांनी मुंबईतील रुपारेल कॉलेजमधून लॉ ची पदवी देखील घेतली होती. त्यानंतर डिप्लोमा कोर्स देखील केला. त्यांनी वेगवेगळ्या इंग्रजी दैनिकांमधून काम केले होते.
डिसेंबर २००५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा अंडरवर्ल्डशी संबंधित एक स्टोरी केली होती. त्यात सुजाता निकाळजे ज्या राजन निकाळजे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्याबाबत काय घडले याविषयीचा उल्लेख होता.
मिड डे मध्ये काम करताना त्यांनी त्याविषयी काही स्टोरीज केल्या होत्या. त्यानंतर वोरा यांनी एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याविषयी केलेली बातमी देखील चांगलीच गाजली होती.
२०११ मध्ये जे काही घडलं त्यानंतर मात्र वोरा यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाल्याचे दिसून आले. त्यावेळी वोरा या ३७ वर्षांच्या होत्या.
ज्योतिर्मय डे ज्यांना जे डे नावानं ओळखले जात होते. त्यांच्या हत्येप्रकरणात वोरा यांना संशयित म्हणून अटक करण्यात आले होते.
२०१६ मध्ये ती केस सीबीआयकडे देण्यात आली होती. वोरा यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे चुकीचे असून आपल्याला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचे म्हटले होते.