पालकत्व निभावताना... : मामाचा गाव...

Mamacha-Gav
Mamacha-Gav

रेवती सकाळपासून खिडकीशी जरा खिन्नतेने बसली होती. आईने सुरुवातीला दुर्लक्ष केले. अर्ध्या तासानंतर आईने रेवतीला हाक मारली. दोन-तीन हाका मारल्यानंतर काहीशा नाराजीने रेवती आली. आईने खायला दिले ते शांतपणे खाल्ले आणि परत खिडकीशी जाऊन बसली. कदाचित दिवसभर घरात बसून कंटाळा आला असेल, असा विचार करून आई आपल्या कामाला लागली. दुसऱ्या दिवशीही रेवतीचा मूड गेलेला पाहून आईने जरा काळजीने विचारले, ‘‘कोणा मैत्रिणीबरोबर काही भांडण झाले काय?’’ मात्र, रेवतीने काहीच उत्तर दिले नाही. जरा जोरात विचारल्यावर रेवती बोलती झाली. म्हणाली, ‘‘आई, मला मामाची आणि त्याच्या गावाची खूप आठवण येत आहे.’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेवतीच्या या उत्तराने आईही भूतकाळात गेली. कोकणातील टुमदार गाव आणि मोठ्ठे अंगण-ओसरी असलेले टुमदार बैठे घर. परसात पोफळी, सुपारीची बाग आणि काही अंतरावरील आमराईची तिला आठवण झाली. लहानपणी मैत्रिणींसोबत केलेली मजा-मस्ती तिला आठवली. उन्हाळ्याच्या सुटीत रेवतीला गावी घेऊन जाण्याचा क्रम तिने कसोशीने पाळला आहे.

रेवतीलाही मामच्या गावाची प्रचंड ओढ निर्माण झाली. कधी परीक्षा संपते आणि कधी मामाकडे जाते, असे तिला दरवर्षी होत असे. परीक्षा संपल्यावर आजोळी गेलेली रेवती थेट जूनमध्येच अगदी शाळा सुरू व्हायच्या तीन ते चार दिवस आधी घरी यायची. ती दीड महिना मस्तपैकी आंब्याचा, फणसाचा मनसोक्त आनंद लुटायची. सायंकाळी समुद्रावर फिरायला जायला आणि तिथे खेळायला तिला प्रचंड आवडायचे. पाण्याचे तिला प्रचंड आकर्षण. एरवी आई-बाबांबरोबर ती वॉटरपार्कमध्ये जायची, परंतु समुद्रातील पाण्यात खेळण्याचा आनंद काही औरच असतो, हे तिला जाणवायचे. आजी-आजोबा, मामा-मामी यांच्याकडून होणारे लाड, मामे भांवडे, त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर दिवसभर खेळायला मिळणे, ओल्या पापड्या, पापड व अन्य वाळवणाची मेजवानी मिळत असल्याने ती खूष असायची. यावर्षी मात्र या साऱ्या आनंदाला ती मुकली होती. 

‘‘आई, यावर्षी आजोळी नाही ना जाता येणार,’’ या प्रश्नाने रेवतीची आई भानावर आली. दोन दिवसांपासून रेवती का नाराज आहे तिच्या लक्षात आले. पण तिचा नाईलाज होता. सद्यःस्थितीत बाहेर पडणे शक्य नसल्याने रेवतीची काय समजूत काढावी, असा तिला प्रश्‍न पडला. 

‘‘अगं, आज सायंकाळी आपण सर्वांशी व्हिडिओ कॉल करू आणि बोलू,’’ असं म्हणून तिने रेवतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर क्षणाचाही विलंब न करता रेवती म्हणाली, ‘‘आई, सर्वांशी बोलणे नक्की होईल, मात्र तिथे येणारी धमालमस्ती थोडीच येणारे.’’ रेवतीच्या या उत्तराने तिची आई मात्र काहीच बोलू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com