esakal | दर्जेदार विनोदाची बांधणी 
sakal

बोलून बातमी शोधा

दर्जेदार विनोदाची बांधणी 

अशोक सराफ आणि संदीप यांची पहिली भेट झाली ती २००८ मध्ये. त्यावेळी ‘पकडापकडी’ हा मराठी चित्रपट संदीपने दिग्दर्शित केला होता आणि त्यात अशोक सराफ यांची भूमिका होती.

दर्जेदार विनोदाची बांधणी 

sakal_logo
By
अशोक सराफ - संदीप नवरे

लॉकडाऊनचा काळ चित्रपट क्षेत्रासाठी आव्हानात्मक होता. त्यातदेखील सारी आव्हाने पेलत संदीप मनोहर नवरे लिखित आणि दिग्दर्शित ‘आलटून पालटून’ हा चित्रपट झी टॉकीजवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका आहे. त्या निमित्ताने अशोक सराफ आणि संदीप नवरे यांच्याशी संपर्क साधला. अशोक सराफ आणि संदीप यांची पहिली भेट झाली ती २००८ मध्ये. त्यावेळी ‘पकडापकडी’ हा मराठी चित्रपट संदीपने दिग्दर्शित केला होता आणि त्यात अशोक सराफ यांची भूमिका होती.

अशोक सराफ म्हणतात, ‘‘संदीप हा चांगला दिग्दर्शक आहे. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव अर्थातच चांगला आहे. स्क्रिप्ट स्वीकारताना ती चांगली हवी, याबाबत माझा आग्रह असतो. ‘आलटून पालटून’ची संहिता मला आवडली. संदीप स्वभावानेदेखील खूप चांगला मुलगा आहे. आपण जेव्हा एखादी सूचना करतो किंवा माझ्या सवयीप्रमाणे मी एखाद्या वेळी दिग्दर्शकाला प्रश्न विचारतो, की अमुकअमुक गोष्ट अशी का हवी? मला दिग्दर्शकाचा दृष्टिकोन जाणून घ्यायचा असतो आणि संदीपच्या बाबतीत म्हणाल, तर ही सर्व उत्तरे संदीपकडे असतात.’’ 

अशोक सराफ यांच्याबरोबर काम करताना दडपण नाही आले का, या प्रश्नावर संदीप म्हणाला, ‘‘अशोक सराफ माझ्या गुरुस्थानी आहेत. त्यांचे चित्रपट मी माझ्या लहानपणापासून बघत आलो आहे. या व्यक्तीबरोबर काम करताना त्यांच्याकडून मला खूप काही शिकायचे आहे, ही भावना माझ्या मनात होती. एक उदाहरण सांगतो. ‘आलटून पालटून’मध्ये अशोक सराफ आणि भाऊ कदम आहेत. त्या दोघांमधील दृश्यात वाक्यानुसार जी अशोकमामांची प्रतिक्रिया आहे, तीसुद्धा खूप काही शिकवणारी आहे.’’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशोक सराफ म्हणतात, ‘‘एखादे दृश्य चित्रित होताना त्या संवादातील दोन ओळींमध्ये दडलेला अर्थ जाणून घेणे गरजेचे असते. ‘रीडिंग बिटवीन लाईन्स’ ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. कोणताही चित्रपट हा प्रेक्षकांना आनंद देणारा असला पाहिजे. त्यातून प्रेक्षकांना चांगलेच मिळाले पाहिजे.’’ 

संदीप सांगतो, ‘‘अशोक सराफ हे अतिशय वक्तशीर आहेत आणि या गोष्टीचा फायदा हा अर्थातच सर्वांना होतो. या क्षेत्रात अनेक दशके काम करत असणारे एवढे ज्येष्ठ कलावंत वेळेच्या आधी मेकअप करून तयार आहेत, हे बघितल्यावर आपोआप सर्वच जण वेळेत तयार होतात.’’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाऊनच्या काळाविषयी अशोक सराफ सांगतात, ‘‘फार कठीण काळ होता तो! अशा वेळी निखळ मनोरंजन करणारे काही तरी हवे होते आणि ती इच्छा ‘आलटून पालटून’च्या निमित्ताने पूर्ण झाली. विनोद कधीच संपणार नाही; पण तो चांगल्या पद्धतीने सादर व्हायला हवा. विनोद हा सकारात्मकतेकडे नेणारा एक मार्ग आहे.’’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(शब्दांकन : गणेश आचवल)