esakal | मैत्रीची भन्नाट केमिस्ट्री
sakal

बोलून बातमी शोधा

मैत्रीची भन्नाट केमिस्ट्री

रसिकानं ‘पोश्टर गर्ल’ या चित्रपटात केलेली लावणी अनिताला फार आवडली. रसिकानंही अनिताने मालिका आणि चित्रपटांमधून केलेली सगळी कामं पाहिली. रसिका विशेषकरून अनितानं ‘अय्या’ आणि ‘तुंबाड’ या चित्रपटांतल्या भूमिकांच्या प्रेमात आहे.

मैत्रीची भन्नाट केमिस्ट्री

sakal_logo
By
रसिका सुनील-अनिता दाते

रसिका सुनील-अनिता दाते

गेली काही वर्षं ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मलिकेतून आपल्या भेटीला येणाऱ्या राधिका आणि शनाया यांची केमिस्ट्री आपण छोट्या पडद्यावर बघत आलोच आहोत. ऑफस्क्रीन मात्र त्या मालिकेच्या सुरुवातीपासूनच खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांची पहिली भेट ही मालिकेच्या ऑडिशनच्या वेळी झाली. त्यापूर्वी रसिकानं ‘पोश्टर गर्ल’ या चित्रपटात केलेली लावणी अनिताला फार आवडली. रसिकानंही अनिताने मालिका आणि चित्रपटांमधून केलेली सगळी कामं पाहिली. रसिका विशेषकरून अनितानं ‘अय्या’ आणि ‘तुंबाड’ या चित्रपटांतल्या भूमिकांच्या प्रेमात आहे.

रसिकाबद्दल अनिता म्हणाली, ‘‘मालिकेत रसिका शनायाची भूमिका साकारत असली, तरी प्रत्यक्षात मात्र शनाया आणि रसिकामध्ये अजिबात साम्य नाही. रसिका खूप गोड आणि लाघवी आहे. तिला स्वतःचे लाड करून घ्यायला फार आवडतात. ती खूप पटकन सगळ्यांना आपलंसं करून टाकते. कोणतीही गोष्ट ती उत्स्फूर्तपणे करते. आणखी एक मला तिच्यामधली आवडणारी बाजू म्हणजे आपल्या विचारांवर, आपण घेतलेल्या निर्णयावर, केलेल्या कृतीवर ठाम असणं. तिनं एखादी गोष्ट केली, की ती पुन्हा मागे वळून त्याकडे बघत नाही, कोणालाही ती घाबरत नाही. रसिकाला अनेक गोष्टी उत्तम करता येतात. ती छान नृत्य करते, तिचा आवाज फार छान आहे, खूप मस्त गाते ती. त्यामुळे सेटवरही आम्ही अनेक वेळा तिला एखादं गाणं गाण्याची फर्माईश करतो. रसिका सेटवर कधीच रिकामी बसलेली दिसणार नाही. एखादं गाणं लिहिणं असेल, नवं काहीतरी शिकणं असेल, वाचन असेल; कायम ती स्वतःला एक्स्प्लोअर करत असते. मध्यंतरी ती अमेरिकेला गेली होती, तिथं तिनं नवीन कोर्स केलाच; सोबत अशा अनेक गोष्टी केल्या ज्यांनी तिला एक कलाकार म्हणून आणखी समृद्ध केलं. त्या काळातही आमचं बोलणं व्हायचं. तिथं तिचं काय आणि कसं चालू आहे हे आम्हाला माहीत असायचं. सेटवर आम्ही विविध विषयांवर भरपूर गप्पा मारतो. एकमेकींना छान वेळ देतो- ज्यामुळे आमच्यातलं बॉंडिंगही आणखी घट्ट होतं आणि काम करायलाही मजा येते.’’

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रसिकानं अनिताबद्दल सांगितलं, की ‘‘अनिता ही गोड, स्ट्रीक्ट आणि सार्कॅस्टिक या सगळ्याचं एक कमाल कॉन्बिनेशन आहे. ती खूप अनप्रेडिक्टेबल आहे. ती एखाद्या गोष्टीवर कशी रिअॅक्ट होईल आणि कधी काय बोलेल याचा आपल्याला कधीच अंदाज बांधता येत नाही; पण एक आहे, की ते सगळं ती खूप चांगल्या मनानं बोलते. तुम्ही तिच्यासोबत जेवढा जास्त वेळ घालवाल, तेवढी ती तुम्हाला आणखी आणखी कळत जाते. ती आपली मस्करी करत असली, तरी एका पॉईंटनंतर तुम्हाला कळत जातं, की याच्या मुळाशी फक्त प्रेम आहे. अनिताचे अनेक गुण मला भावतात; पण तिचं आमच्या सेटवरच्या लहान-मोठ्या अशा प्रत्येकाशी एक खास आणि वेगळं असं नातं आहे. ती जशी आहे तशीच खरीखरी समोरच्याशी वागते- बोलते. दुसऱ्यांसाठी स्वतःला बदलायला जात नाही. तिच्या स्वभावानं ती सगळ्यांना सामावून घेते. ही तिच्यातली गोष्ट मला फार आवडते. आपुलकीने सगळ्या गोष्टी करणं हा गुण राधिका आणि अनितामध्ये कॉमन आहे.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘मालिकेचं नाव ‘माझ्या नवऱ्याची बायको’ म्हटल्यावर कधीतरी आम्ही दोघी बायका एकत्र येणार हे उघड होतं, तो योग चार वर्षांनी जुळून आला. त्यामुळे मालिकेतला खरा खलनायक हा गुरुनाथ आहे हे स्पष्ट झालं आहे,’’ असं अनिता सांगत होती. रसिका म्हणाली, ‘‘आत्ता राधिका आणि शनायाची छान मैत्री झाली आहे. आमची जी ऑफस्क्रीन केमिस्ट्री आहे ती आता आम्हाला ऑन स्क्रीन दाखवायची आहे; त्यामुळे मला खूप मजा येतेय.’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(शब्दांकन - राजसी वैद्य)