ऑन डिफरन्ट ट्रॅक : समाजसेवेचा ध्यास 

शिल्पा परांडेकर 
Saturday, 1 August 2020

समाजासाठी आपणही काहीतरी खारीचा वाटा उचलावा, या विचारांनी ती मार्गदर्शक व्यक्ती, तिचे गुरू व पालक यांच्या सोबतीने व मार्गदर्शनाखाली शालेय जीवनापासूनच विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे.

नाव - शीतल इंद्रजीत शेखे 
गाव - पुणे 
व्यवसाय - सॉफ्टवेअर इंजिनिअर 
वय - २३ वर्षे 

युवाशक्ती ही कोणत्याही राष्ट्राची संपत्ती असते व ती राष्ट्राला एक नवी दिशा देण्याचे काम करते. त्यामुळेच स्वामी विवेकांनद ते पंतप्रधान मोदीपंर्यंत सर्वांनी या युवाशक्तीला देशासाठी, समाजासाठी संघटीत होऊन कार्य करण्यासाठी वेळोवेळी संबोधित केले आहे. 

अशीच एक युवा समाजासाठी, भावी पिढीसाठी अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवित आहे. शीतलला समाजकार्याची आवड तिच्या लहानपणीच लागली. समाजासाठी आपणही काहीतरी खारीचा वाटा उचलावा, या विचारांनी ती मार्गदर्शक व्यक्ती, तिचे गुरू व पालक यांच्या सोबतीने व मार्गदर्शनाखाली शालेय जीवनापासूनच विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शीतल करिअर सांभाळत महिला, शालेय विद्यार्थी व तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, वाहतूक नियमांबाबत जनजागृती, तरुणींसाठी सेल्फ डिफेन्स अशा अनेक विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेते. वेश्या व्यवसायातील महिलांच्या मुलांसाठी आत्मविश्वास, समाजव्यवस्था, बालवयातील मुलींसाठी ‘गुड टच अँड बॅड टच’ यांविषयावर विशेष सत्रांचे आयोजन ती करते. शीतलने ‘जनकल्याण ब्लडबॅंके’सोबत भारतातील पहिले ‘प्लेटलेट्स डोनेशन कॅम्पस्’ राबिवले आणि त्यांचा भारतभर विस्तार केला. यासाठी शंभरपेक्षा अधिक कार्यक्रम घेतल्याचे ती सांगते. 

ती राबवित असलेल्या या अनेक उपक्रमांमध्ये एक उपक्रम अगदी अनोखा आहे. ‘आपल्या सर्वांसमोर लहानपणापासून प्रत्येक क्रांतीकारकाची एक विशिष्ट प्रतिमा व कार्यच डोळ्यासमोर असते. परंतु, त्याव्यतिरिक्तही त्यांच्या अनेक प्रेरणादायी गोष्टी आहेत की ज्या मुलांना शालेय जीवनात कळाल्यास त्याचा त्यांच्यावर चांगला प्रभाव पडतो. आणि त्या गोष्टीरूपात सांगितल्यास त्या त्यांच्या कायम लक्षात राहतात, असा माझा अनुभव आहे,’ शीतल सांगते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शीतलच्या कामाची दखल राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरही घेण्यात आली आहे. नुकतीच तिची ‘भारतीय राष्ट्रीय युवा परिषदे’ची पुणे विभागाची ‘सचिव’ तसेच ‘एनजीओ फ्रेंड्स अकॅडमी’ची ‘महाराष्ट्र राज्य समन्वयक’ म्हणून निवड झाली आहे. 

या स्वतःच्या उपक्रमांबरोबरच ती हेल्पिंग हॅंड्स, अंघोळीची गोळी, ध्येय फाउंडेशन, परिवर्तन अशा विविध सामाजिक संस्थांसोबतदेखील अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी होत असते. शीतल सांगते, ‘लोकांशी संवाद साधणे, नाटक, वक्तृत्व, वाचन हे तिचे छंद तिच्या कामात सहजता आणतात. शेवटी कोणतेही काम म्हटले की अडचणी या असणारच तशा त्या समाजकार्यातही येतात.’ मात्र सामाजिक क्षेत्रात काम करण्याची जिद्द आणि आवड असेल तर आपण सर्व अडचणींवर मात करू शकतो, यावर तिचा ठाम विश्‍वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about sheetal shekhe social work