esakal | पालकत्व निभावताना... : एक उनाड दिवस..!
sakal

बोलून बातमी शोधा

Parenting

एखादं मोरपीस फिरावं तसा दिवस आज सीमाच्या आयुष्यात उगवला. सासू-सासरे चारधाम यात्रेला गेले होते. पती ऑफिसच्या कामानिमित्त चार दिवसांसाठी बंगळूरला आणि घरातील लाडली दूर्वा शाळेच्या ट्रिपच्या निमित्तानं कोल्हापूरला गेली होती.

पालकत्व निभावताना... : एक उनाड दिवस..!

sakal_logo
By
आशिष तागडे

एखादं मोरपीस फिरावं तसा दिवस आज सीमाच्या आयुष्यात उगवला. सासू-सासरे चारधाम यात्रेला गेले होते. पती ऑफिसच्या कामानिमित्त चार दिवसांसाठी बंगळूरला आणि घरातील लाडली दूर्वा शाळेच्या ट्रिपच्या निमित्तानं कोल्हापूरला गेली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळी ऑफिसला जायची तयारी करत असताना अचानक सीमाला आठवलं...अरे, आज तर चक्क सुटी आहे. कधी नव्हे ती महाशिवरात्रीनिमित्तानं ऑफिसनं अचानक सुटी जाहीर केली होती. घरात सीमा चक्क एकटीच होती. तिनं सकाळी सकाळी नात्यानं सख्खी नणंद, परंतु घट्ट मैत्रीण असलेल्या सुरेखाला ‘दोघी मिळून दिवस एन्जॉय करू,’ असा विचार करत फोन लावला. सुरेखाला परिस्थिती सांगितली. त्यावर ती म्हणाली, ‘अगं, माझ्या ऑफिसमध्ये नेमके आजच प्रेझेंटेशन ठेवले आहे, त्याची सारी जबाबदारी माझ्यावर आहे. तू एक काम कर, तूच सुटी सेलिब्रेट कर. आपल्याला तरी केव्हा असी संधी मिळणार...!’ सुरेखानं सुचविल्यामुळं सीमाच्या मनात विचारचक्र सुरू झालं. आपण आज खरंच उनाड दिवस घालावला तर...! तेवढ्यात दारावरची बेल वाजली. रोजची कामवाली आली होती. सीमाचा खुललेला चेहरा पाहत ती म्हणाली, ‘ताई, आज काय विशेष, खूप खूश दिसत आहात. स्वयंपाकाला काय करू?’ त्यावर सीमा म्हणाली, ‘आज आपल्या दोघींचा स्वयंपाक कर. म्हणजे आज शिवरात्र आहे, दोघीही मस्त फराळ करू.’ ताईंच्या या रूपानं आश्चर्यचकित झालेल्या कामवाल्या बाईनं घरकाम करून फराळाचे जिन्नस तयार केले. दोघींनी त्याचा आस्वाद घेतला. 

कामवाली बाई जाण्यापूर्वी सीमानं तिच्या मदतीनं वरच्या बाजूला असलेला ‘की-बोर्ड’ काढून घेतला. तिची हौस म्हणून गेल्या वर्षी वाढदिवसाला घरातील सर्वांनी मिळून तिला चांगला ‘की-बोर्ड’ भेट दिला होता. नव्याचे नऊ दिवस झाल्यावर तो वर ठेवला गेला होता. सीमानं तो आज खाली काढला. त्याची जोडणी झाल्यावर सहज त्याच्यावरून हात फिरवल्यावर तिलाच मोहरल्यासारखं झालं. तसं तिनं त्याचं प्राथमिक शिक्षणही घेतलं होतं. मस्तपैकी दीडएक तास तिची बोटं ‘की-बोर्ड’वर फिरत होती. त्यानंतर दुपारी तासभर तिनं मस्तपैकी झोप काढली. अनेक दिवसांपासून मनात असलेली गाणी ‘यू-ट्यूब’ लावत घराच्या बाल्कनीत बसून घोट-घोट चहा घेतला.

शिवरात्र आणि सकाळीच कामवाल्याबाईनं फराळाचे पदार्थ करून ठेवल्यानं रात्रीच्या जेवणासाठी काय करायचं, हा प्रश्‍न तिच्यापुढं नव्हता. सहजच पावलं पुस्तकांच्या कप्प्याकडं वळाली. अनेक दिवसांपासून मनात ठरविलेले पुस्तक वाचनासाठी बाहेर काढलं. अधाशासारखं त्याचं वाचन सुरू केलं. त्या नादात किती वाजले याचं भानही सीमाला राहिलं नाही. अचानक फोन वाजल्यानं ती भानावर आली. मैत्रिणीचा फोन होता. ती म्हणाली, ‘अगं मी माझ्या मुलीबरोबर दूर्वालाही शाळेतून घेऊन येते.’ त्यावर सीमाला जाणीव झाली, अरे दहा वाजता दूर्वाची सहल येणार आहे, मात्र तिला आणायला जायचा प्रश्‍न परस्पर सुटलाही होता. तिच्या मनात विचार आला, ‘भगवान देता है तो छप्पर फाडके...’ ज्या घरासाठी आपण १०-१० तास बाहेर असतो त्या घरातील प्रत्येक कोपरा आज तिनं समाधानानं न्याहाळला होता. तिनं आज खऱ्या अर्थानं ‘नो मोबाईल, नो व्हेईकल डे’ पाळला होता.

loading image