पालकत्व निभावताना... : अनोखी दिवाळी..!

Maintaining Guardianship
Maintaining Guardianship

आकाश भलताच खूष होता. कारण, दरवर्षी दिवाळीच्या सुटीत किल्ला बनविण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळायचा नाही. परीक्षा, त्यानंतर सुटीत दिलेला अभ्यास करण्यासाठी आई-बाबांची भुणभूण, यामुळे त्याला मनातील किल्ला करण्यासाठी वावच मिळत नसायचा. अर्थात, सोसायटीतील त्याच्या सर्वच मित्रांची ही तक्रार होती. या वेळी कोरोनामुळे मिळालेल्या दीर्घ सुटीतच दिवाळीत कोणता किल्ला करायचा याचे पुरेपूर प्लॅनिंग केले होते. ऑनलाइन वर्ग सुरू असले, तरी दररोज शाळेत जाण्याची कटकट तर नव्हती. यंदा सुटीत दिवाळी आली, का मिळालेली सुटी दिवाळीची आहे, हेच लक्षात येत नव्हते. कोणता किल्ला करायचा यावर मात्र एकमत होत नव्हते. यावर उद्या पुन्हा ‘शॉर्ट मीटिंग’ घेण्याच्या निर्णयावर बच्चे कंपनी आपापल्या घरी गेली. आकाशचा चेहरा पाहून बाबांनी विचारले, ‘आजही काही निर्णय झाला नाही का?’ आकाशने नाराजीच्या सुरात यंदा किल्लाच करायचा नाही, असा निर्वाणीचा संदेश दिला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आकाशला काय झाले, याची बाबाला कल्पना आली होती. दुसऱ्या दिवशी आकाश उठल्याबरोबर त्याने किल्ला करायची काय तयारी झाली याची चाचपणी केली. वाड्यात आम्ही कशा पद्धतीने किल्ला करायचो याचे वर्णन केले. आकाश ते शांतपणे ऐकत होता. दुपारी बच्चे कंपनीची बैठक होऊन प्रतापगड किल्ला करायचे निश्चित करण्यात आले. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली. आकाशला मात्र हे फार पटले नव्हते. बाबा कधी घरी येतोय आणि त्याला सर्व सांगतो, असे त्याला झाले होते. बाबा ऑफिसमधून आल्याबरोबर त्याने सारा प्लॅन सांगितला. आणि किल्ल्यावर ठेवण्यासाठी लवकर खेळणी आणून देण्यास सांगितले. तशी बाबाने तयारीही दाखविली. आकाश मात्र मनातून फार खूष नसल्याचे बाबाच्या लक्षात आले होते. बाबाने जरा वेगळ्या पद्धतीने विचारल्यावर आकाश म्हणाला, ‘बाबा मला काही उमजत नाही. काय करावे ते. मूडच होत नाही.’ त्यावर बाबा म्हणाला, ‘आकाश सात-आठ महिने आपण घराबाहेर पडलेलो नाही. आता किल्ल्यांवर जायला परवानगी आहे.

आपण असे करूयात सोसायटीतील मित्र-मैत्रिणी तुम्ही ठरविलेल्या किल्ल्यावर सकाळी लवकर जाऊयात. बरोबर दिवाळीतल्या फराळाचे जिन्नस घेऊन जाऊयात. तिथे राहणाऱ्या मुलांना ते देऊयात. मी एका संस्थेशी बोललो आहे, ती तुमच्या वयाच्या किमान पंचवीस लहान मुलांना नवीन कपडे देणार आहेत. आपण ते किल्ल्यावर राहणाऱ्या गरजूंना देऊयात. त्याचबरोबर किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवूयात. जरा हटके दिवाळी साजरी करायला काय हरकत आहे?’

बाबाच्या या अनोख्या कल्पनेचे आकाशला अप्रूप वाटले. काहीही न बोलता तो अत्यानंदाने घराबाहेर पडला. ही कल्पना कधी एकदा मित्रांना सांगतो, असे त्याला झाले होते. या कल्पनेने बच्चेकंपनीही खूष झाली. एकीकडे सोसायटीत किल्ल्याची तयारी सुरू असताना, दुसरीकडे बच्चेकंपनी मनाने किल्ल्यावर पोचलीही होती.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com