आईशी संवाद : बाळाचा पूरक आहार

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ
Friday, 7 February 2020

हे देऊ नका 
सध्या अनेक माता पूरक आहार म्हणून बिस्किटे भरवतात. बाळाला कधीही बिस्किटे किंवा पाकिटातून फोडून द्यावे लागतील असे कुठलेही अन्न देऊ नये. तसेच, एकदा पूरक आहार सुरू केल्यावर रोज वरचे दूध दिलेच पाहिजे असेही नाही. स्तन्यपानातून जितके दूध मिळते ते पुरेसे असते. पूरक आहार सुरू करताना जास्त प्रमाणात वरचे दूध दिल्यास बाळाचे पोट भरते आणि मग ते पूरक आहार नीट घेत नाही.

साधारण ६ महिन्यांपासून बाळाला आईच्या दुधाबरोबर पूरक आहार देणे अत्यंत गरजेचे असते. सध्या पूरक आहारासाठी कृत्रिम डबाबंद आहार वापरला जातो. आईने किंवा कुटुंबातील सदस्याने घरी बनवलेला नैसर्गिक आहार हा बाजारात मिळणाऱ्या डबाबंद आहारापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो. त्याकरिता आपल्या कुटुंबासाठी आपण जे अन्नपदार्थ बनवता, त्यापैकी काही पदार्थ बारीक व मऊ करून, मसाला किंवा तिखट न घालता चवीला व दिसायला आकर्षक बनवून बाळाला पूरक आहार म्हणून सुरू करू शकता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्तन्यपानासोबत पूरक आहार सुरू केल्यावर बऱ्याच मातांची तक्रार असते, की बाळ अन्न भरवताच जिभेने ढकलून बाहेर काढते. याचा अर्थ असा नाही, की बाळास ते अन्नपदार्थ आवडत नसल्यामुळे बाळ ते थुंकून टाकतं. या वयातील अन्नपदार्थ लाळेत मिसळून व्यवस्थित गिळण्याची क्रिया ते शिकत असतं. तेच पदार्थ परत देण्याचा प्रयत्न केल्यास हळूहळू बाळाला त्याची सवय होते.

बाळासाठी पूरक आहार
1) ६ ते ७ महिने एका फळाचा रस : संत्री, मोसंबी यातून बाळास ‘क’ जीवनसत्त्व मिळते, जे दुधामध्ये नसते.
2) भाज्यांचे सूप : हिरव्या पालेभाज्यांच्या सुपामधून बाळास लोह, कॅल्शिअम व ‘क’ जीवनसत्त्व मिळते. टोमॅटो सूप, गाजर सूप, मिक्स भाज्यांचे सूपही आपण देऊ शकता.
3) सुरुवातीला तृणधान्याची पेज : तांदळाची पेज, नाचणीची खीर, रव्याची खीर, त्यानंतर मूगडाळमिश्रित तृणधान्याची पेज.
4) ८ ते ९ महिने : बारीक केलेली केळी, चिकू, उकडलेले बटाटे, रताळी, पेज व खिरीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी घालून थोडी जास्त घट्ट करून घ्यावी.
5) ९ ते १० महिने : मऊ वरण-भात, इडली, उप्पीट, मऊ शिरा, दही, बटाटा.
6) ११ ते १२ महिने : मऊ पोळी किंवा भाकरी दुधात किंवा वरणात कुस्करून, पराठे मऊ करून, शिजवलेल्या फळभाज्या व पालेभाज्या इत्यादी. मिश्र धान्याचे पीठ तुम्ही तयार करून घेऊ शकता. उदा. तांदूळ, नाचणी, मूगडाळ, सोयाबीन, साबुदाणा हे एकत्रित धान्यपिठे एका हवाबंद डब्यात ठेवा. हे वापरून विशेष खटाटोप न करता तुम्ही रोजच्या कूकरमध्ये दिवसातून २ वेळा तुमच्या बाळाला देऊ शकता. प्रत्येक वेळी घरच्या जेवण्यासाठी कूकर लावताना १ लहान वाटी बाळासाठी ठेवावी त्यात १ मोठा चमचा मिश्र धान्यपिठे व घरात असलेली कुठलीही भाजी उदा. लाल भोपळ्याचा तुकडा, गाजर, टोमॅटो किंवा पालकाची २ पाने, कोबीचे छोटे तुकडे ठेवावेत. कूकरमध्ये शिजवून झाल्यावर ४ चमचे दूध व १ चमचा तूप, थोडे मीठ, कधी चवीला थोडा गूळ घालून मिक्सरमधून काढावे.

लहान मुलांच्या आहारात बालरोगशास्त्रात मालटिंगचे महत्त्व सांगितले आहे. मालटिंग म्हणजे तृणधान्ये व डाळी अंकुरित करून त्यांना वाळवून मिक्सरमधून बारीक करून घेणे व नंतर ते शिजवून देणे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr amol annadate on Baby Supplements