आईशी संवाद : लहान मुलांमधील रडणं

Child-Crying
Child-Crying

लहान मुलांमध्ये रडणं हे पहिल्या वर्षात त्यांना काय होतंय, काय हवंय हे सांगण्याची भाषा असते. काही मुले कमी रडतात आणि काही जास्त रडतात. बाळाचे तीन आठवड्यापासून तीन महिन्यांपर्यंत संध्याकाळच्या वेळेला रडणे ही बऱ्याच प्रमाणात आढळणारी समस्या आहे. याला वैद्यकीय भाषेत इव्हिनिंग कोलीक, असे म्हणतात.

खरंतर याला काही निश्चित कारण नसतं. बऱ्याचदा गॅस झाला असं एक कारण चिकटवलं जातं. या विषयी प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अनिल मोकाशी यांचे एक वाक्य आहे - ‘पोटात गॅस नावाचं एक भूत असतं. खरं भूत नसतंच, पण ते घाबरणाऱ्या आईच्या मानगुटीवर बसते. म्हणून या गॅस नावाच्या भुताला घाबरू नये.’ या गॅसला घरगुती उपाय म्हणून पोटाला आल्याचा रस, पेस्ट असे बरेच काही लावले जाते. हे प्रकार कधीही करू नये.

संध्याकाळच्या रडण्यावर बाळाला खेळवणं, बोलणं आणि त्याला गाडीतून फिरवून आणणं हा चांगला उपाय असतो. अर्थात, बालरोगतज्ज्ञांचा सल्लाही आवश्यक आहेच. बाळ रडतं तेव्हा ते आपल्याला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाळ रडतं तेव्हा तीन महत्त्वाच्या शक्यता आधी पडताळून पाहाव्यात. ओलं झालेलं डायपर किंवा शी-शू केलेली आहे का, भूक लागलेली आहे? ‘पाजायला दे’ हा रडण्याचा दुसरा संदेश असू शकतो. पिणे संपल्यावर बाळ रडत असल्यास पाठीवर थापटून ढेकर काढा, हे त्याला सांगायचं असतं. किंवा झोप आलेली असल्यावर बाळ रडतं. बऱ्याचदा घट्ट असलेल्या कपड्यात उकडणं किंवा थंडी वाजणं ही बाळाच्या रडण्याची कारणं असू शकतात. कधीकधी फक्त बाळाला जवळ घेतल्यानं आणि आईच्या ह्रदयाचे ठोके ऐकल्यानं रडणारं बाळ शांत होतं. काही बाळांना जास्त रडण्याची सवय असते. मोठ्या माणसाचा स्वभाव असतो, तसा लहान बाळाचाही स्वभाव असतो. काही मुलं उगीचच जास्त रडतात तर काही शांत असतात.

बऱ्याचदा मोठ्या आवाजामुळं किंवा जास्त प्रकाशामुळंही बाळ रडतं. आपल्याला थकवा येतो, तसाच बाळालाही येऊ शकतो. यावेळी बाळ रडतं आणि चिडचिड करून थोड्या वेळात झोपी जातं. शरीरातील कमी असलेलं रक्त म्हणजे अॅनिमिया, हे काही बाळांचं रडण्याचं आणि चिडचिड करण्याचं कारण असू शकतं. त्यामुळं कुठल्याही कारणाशिवाय रडणाऱ्या बाळाची हिमोग्लोबिनची तपासणी करावी व गरज असल्यास त्याला आयर्नचं (लोह) औषध द्यावं लागतं. असंच कुठलंही कारण नसताना बाळ सतत सहा तासांच्या वर रडत असल्यास ते आजारी असण्याची शक्यता पडताळून पाहावी लागते. 

बाळ रडत असल्यावर त्याच्याकडं लगेच लक्ष द्यावं. बाळाच्या रडण्याचा वेळ वाढतो, तसं त्याला शांत करणं अवघड जातं. बाळ रडत असल्यावर बऱ्याचदा आईही रडायला लागते. यानं बाळाचं रडणं आणखी वाढतं. त्याऐवजी शांत राहून वर दिलेल्या यादीतून एकएक गोष्ट तपासून बाळ काय म्हणते आहे, हे समजून घेतल्यास बाळ लवकर शांत होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com